घरपालघरमनोज आचार्य पुस्तकांच्या मुखपृष्ठातून स्मरणात राहतील

मनोज आचार्य पुस्तकांच्या मुखपृष्ठातून स्मरणात राहतील

Subscribe

अशा प्रतिभावंताच्या जाण्याने वसई एका ज्ञानवंताला मुकलेली आहे. उपस्थित वक्त्यांनी मनोज आचार्य यांचे चित्रकला,संगीत, समीक्षा क्षेत्रातील कार्याचा सांगोपांग आढावा घेतला.

वसई : मनोज आचार्य यांनी केवळ चित्रकलाच नाही तर साहित्य व कलेच्या सर्वच प्रांतामध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांनी रेखाटलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाद्वारे ते कायम आपल्या स्मरणात राहतील. मनोज आचार्य हे उत्तम लेखक होतेच पण त्याचबरोबर ते एक पापभिरू व्यक्ती व उत्तम माणूस होते. त्यांच्या अकाली जाण्याने पूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे, असे उद्गार वसई विरार शहर महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी सहयोग केंद्र येथे मनोज आचार्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत बोलताना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर अँण्ड्रयू रॉड्रिग्ज होते.

मनोज आचार्य यांच्या बहुप्रतिभा आणि सखोल अभ्यासाचा उल्लेख करून माजी आमदार डॉमणिक गोन्सालविस आपल्या भाषणात म्हणाले, अशा प्रतिभावंताच्या जाण्याने वसई एका ज्ञानवंताला मुकलेली आहे. उपस्थित वक्त्यांनी मनोज आचार्य यांचे चित्रकला,संगीत, समीक्षा क्षेत्रातील कार्याचा सांगोपांग आढावा घेतला. यावेळी प्रकाशक अशोक मुळे, मधुकर वर्तक , शरद मराठे,चित्रकार फिलिप डिमेलो,प्रसन्न घैसास, रमाकांत बने, सुभाष गोंधळे, फ्रान्सिस डिमेलो, नारायण नाईक, मंदार नेने, भरत पेंढारी, शेखर धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रकार प्रसन्न घैसास यांनी रेखाटलेल्या मनोज आचार्य यांच्या रेखाचित्राचे अनावरण करण्यात आले. दत्ताबुवा वर्तक व सुधीर शिंगाडे यांनी ज्ञानेश्वरीमधील अभंग सादर केले. दिनेश आचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. सायमन मार्टिन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -