घरपालघरराष्ट्रवादी ( अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक

Subscribe

भाईंदरच्या आगरी समाजाच्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेच्या २०११ ते २०१९ या कालावधीत मोहन पाटील हे कार्याध्यक्षपदी होते.

भाईंदर :- मीरा -भाईंदरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. मोहन पाटील हे भाईंदरमधील नामांकित शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष होते. या संस्थेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांना दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निवडणुकांची धामधूम सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हाध्यक्षाला अटक झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते.

भाईंदरच्या आगरी समाजाच्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेच्या २०११ ते २०१९ या कालावधीत मोहन पाटील हे कार्याध्यक्षपदी होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार व आर्थिक अपहार केल्याप्रकरणी संबंधित इसमावर गुन्हे दाखल झाले होते. अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये खिचडी घोटाळा, डिजिटल ओळखपत्र आणि संगणक दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे सहा कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संध्या पाटील यांच्या आदर्श महिला गटाकडून परस्पर शालेय पोषण आहारचे काम काढून मोहन पाटील यांनी ते स्वतःच्या मधुमोहन महिला बचत गटाला परस्पर दिले. शासनाच्या योजनेतील तांदूळ विकला. संगणक व पोषण आहार मधील घोटाळ्याची तक्रार व सतत पाठपुरावा केल्यानंतर २०१९ मध्ये नवघर पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्याध्यक्ष मोहन पाटील, संस्थेचे लेखापाल प्रशांत नरेश पाटील, रिंग इंडियाचे भागीदार न्यूमान रेहमान आणि कुणाल गुडेकर, संस्थेचे वासुदेव पाटील, गुरुनाथ पाटील, दिलीप पाटील, शरद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

- Advertisement -

या नंतर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत १० एप्रिल २०१९ रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जानंतर पाटील यांच्या वकिलांनी वेगवेगळी कारणे सांगून ३२ वेळा तारीख घेतली. या प्रकरणात हळूहळू ४ वर्षे ९ महिन्यांचा कालावधी लोटला. न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने मोहन पाटील यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयास एक महिन्यामध्ये सुनावणी घेऊन सदर अटकपूर्व जामीन अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मोहन पाटील व प्रशांत पाटील यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले तर अन्य आरोपीना जामिनाचा दिलासा दिला. मोहन पाटील व प्रशांत पाटील यांचे अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्यानंतर मोहन पाटील हे फरार झाले होते. तर प्रशांत पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने मोहन पाटील यांना शुक्रवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसाची म्हणजे ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -