घरपालघरबिल्डरला ईडीची बनावट नोटीस दिल्याप्रकरणी एकाला अटक

बिल्डरला ईडीची बनावट नोटीस दिल्याप्रकरणी एकाला अटक

Subscribe

ई.डी. चौकशीची सेटलमेंट करण्यासाठी ५ लाख रुपये मितेश शहा याने मागून व गौतम अग्रवाल याचे सोल सेलींगचे व्यवहाराचे पैसे बाकी नसताना ते गौतम अग्रवाल यास साडे सहा करोड रुपये परत करा, असे सांगून खंडणी मागितली होती.

भाईंदर :- भाईंदरमधील बिल्डर आणि त्याच्या भागीदारांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बनावट समन्स दाखवून ६ कोटी ५५ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. प्रकरणात सहभाग असलेल्या तीन आरोपीपैकी राजू शहा याला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. शहा याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाईंदरमधील सालासर कंपनीचे विकासक आनंद अग्रवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात २२ जानेवारी २०२३ रोजी गौतम अग्रवाल, मितेश शाह आणि राजू शहा यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये मितेश शहा नावाच्या व्यक्तीने त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या नावाने पाठवलेले मूळ समन्स दाखवले. ई. डी. चौकशीचे खोटे समन्स बनवून ते खरे आहे असे भासवले. ई.डी. चौकशीची सेटलमेंट करण्यासाठी ५ लाख रुपये मितेश शहा याने मागून व गौतम अग्रवाल याचे सोल सेलींगचे व्यवहाराचे पैसे बाकी नसताना ते गौतम अग्रवाल यास साडे सहा करोड रुपये परत करा, असे सांगून खंडणी मागितली होती.

ती नोटीस खोटी असल्याची खात्री करून आनंद अग्रवाल यांनी भाईदर पोलीस ठाण्यात जाऊन २२ जानेवारी २०२३ रोजी गौतम अग्रवाल, राजू शाह आणि मितेश शहा यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. मात्र हे संपूर्ण प्रकरण काशिमीरा परिसरातील जमिनीशी संबंधित असल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी ते काशिमीरा पोलीस ठाण्यात वर्ग केले होते.त्यानंतर काशिमिरा पोलिसांनी तपास करून १० मार्च २०२३ रोजी त्या तिघांविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. काशिमिरा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून दिल्लीमध्ये लेखापाल असलेल्या कृष्णकुमार कौशिक याला अटक केली होती. कौशिक याने ईडीचे खोटे समन्स बनवून दिल्याचे उघडकीस आले होते. तेव्हापासून गौतम अग्रवाल, राजू शाह आणि मितेश शहा हे फरार आहेत. शहा याने ठाणे न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेणे सुरू असून बुधवारी पहाटे फरार असलेल्या तिघांपैकी राजू शहा याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू असून लवकरच त्या दोन आरोपीना ताब्यात घेण्यात येईल असे कदम यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -