घरपालघरचिंचणीतील काँक्रीट रस्ता पहिल्याच पावसात उखडला

चिंचणीतील काँक्रीट रस्ता पहिल्याच पावसात उखडला

Subscribe

डहाणू सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण केले.यासाठी जवळपास २ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता.

बोईसर – दोन महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण केलेला चिंचणी गावातील कायम वर्दळ असलेला मुख्य रस्ता पहिल्याच पावसात उखडल्याने ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चिंचणी खाडी नाका ते वाणगाव नाका हा मुख्य रस्ता खराब झाल्याने नागरिक अनेक वर्षे नवीन रस्त्याच्या प्रतीक्षेत होते.मागील पंधरा वर्षे दुरूस्ती न झाल्याने या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली होती.नवीन रस्ता बनविण्यासाठी अनेक वेळा तक्रार आणि निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम होत नसल्याने शेवटी कंटाळून मागील वर्षी गावातील नागरिकांनी जवळपास २ लाखांचा निधी जमा करत गावसहभागातून स्वत:च श्रमदान करीत रस्त्याची दुरूस्ती केली होती.यानंतर जाग आलेल्या डहाणू सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण केले.यासाठी जवळपास २ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता.

मात्र ठेकेदार एन.एस.धानमेहेर यांनी हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे केल्याचा आरोप स्थानिक नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे.काम पूर्ण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर पहिल्याच पावसाच्या माराने रस्त्यावरील काँक्रीटचा वरचा थर धुवून गेला आहे.तर जागोजागी या रस्त्याला भेगा देखील पडायला सुरूवात झाली आहे. चिंचणी खाडी नाका ते वाणगाव नाका हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा आहे.चिंचणी समुद्रकिनारा,चिंचणी गाव,के.डी.हायस्कूल आणि महाविद्यालय,डहाणू,वाणगाव आणि बोईसर-पालघर दिशेला जाण्यासाठी वाहनचालक याच एकमेव रस्त्याचा वापर करतात.यंदा उन्हाळ्यात या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले होते.मात्र पहिल्याच पावसात रस्ता उखडल्याने हा रस्ता पुढे किती वर्षे टिकेल याबाबत चिंचणीकरांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -