घरपालघरचौकातील पाणपोई हरवली ; जारची वाढती मागणी

चौकातील पाणपोई हरवली ; जारची वाढती मागणी

Subscribe

या संस्कृतीला अनुसरूनच समाज कार्यात अग्रेसर संस्था-संघटना, दानशूर व्यक्ती सामाजिक जबाबदारीचे भान जपत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून द्यायचे.

जव्हार: जव्हार शहरात उन्हाची चांगलीच झळ जाणवू लागली आहे. तापमानात ४-५ अंश वाढ नोंद झाली असून तहानलेला जीव शीतल छाया आणि पाण्यासाठी कासाविस होताना दिसत आहे. पूर्वी रस्त्यावरून जाणार्‍या, येणार्‍यांची तहान भागविण्यासाठी पाणपोईची सुविधा सुरू केली जायची. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अनेक संस्था-संघटना आणि दानशूर व्यक्ती स्वखर्चाने अशा पाणपोई सुरू करायच्या. मात्र गेल्या काही वर्षात रस्त्यारस्त्यावर दिसणार्‍या पाणपोई जणू गायबच झाल्याचे चित्र असून सध्या सगळीकडेच पाण्याच्या जारची मागणी वाढत आहे. पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर लाल रंगाच्या फडक्याने झाकून ठेवलेले रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकण आणि पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास असलेली पाणपोई शहरात अनेक ठिकाणी दिसत होत्या, उन्हाळ्यात तर असे रांजण जागोजागी दिसायचे. त्या रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी प्यायले की तहान भागायची. तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीला अनुसरूनच समाज कार्यात अग्रेसर संस्था-संघटना, दानशूर व्यक्ती सामाजिक जबाबदारीचे भान जपत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून द्यायचे.

दरम्यान त्याकाळी शहरात रहदारीचे रस्त्यावर, आठवडी बाजार अशा अनेक ठिकाणी पाणपोई दिसायची. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या वाटसरूंची, गरीब कष्टकर्‍यांची चांगली सोय होत होती. मात्र बिघडलेले निसर्गचक्र, आरोग्य सजगता, पावसाचे घटलेले प्रमाण, कमी झालेले वृक्षसंवर्धन, पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली. पाण्याचा असा “व्यापार” सुरू झाल्यामुळे पाणपोईची जागा जार व बाटलीबंद पाण्याने घेतली. या व्यवहारात मोफत सुविधा असणार्‍या पाणपोई लुप्त झाल्या. इतकेच काय पण बाटलीबंद ’मिनरल वॉटर’ पिण्याची फॅशन आल्यामुळे पाणपोईचे पाणी पिणे अनेकांना आता कमीपणाचे वाटते. हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिणार्‍यांची संख्या अधिक वाढत आहे. परंतु ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही. प्रवासात जार नेणे शक्य नाही, अशा गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल होतात. त्यामुळे शुद्ध व थंडगार पाणी सर्वांना मिळावे म्हणून पाणपोई पुन्हा सुरू करण्याची गरज आहे असे वृध्द नागरिक बोलत आहेत.

- Advertisement -

” आमच्या लहानपणी प्रत्येक गावागावांतील बस थांब्यावर, गाव पाड्यात पाणपोई दिसायची. आता मात्र पाण्याच्या बाटल्या असलेली दुकाने दिसत आहेत. पाणपोई सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– रतन जाधव, ज्येष्ठ नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -