घरपालघरविनापरवाना फटाके विक्री धंद्याची वात पालिकेने पेटवली

विनापरवाना फटाके विक्री धंद्याची वात पालिकेने पेटवली

Subscribe

प्रभारी सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर यांनी संबंधित ७ दुकानदारांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर तुळींज पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : विनापरवाना फटाके विकणार्‍या सात जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई- विरार महापालिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. वसई- विरार शहर महापालिका क्षेत्रात फटाके विक्रीचे दुकान आणि स्टॉल लावण्याकरता प्रभाग समितीस्तरावरून निश्चित केलेल्या ठिकाणी अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने परवानगी दिलेल्या जागेवरच फटाके विक्रीचे दुकान, स्टॉल सुरु आहेत का याची तपासणी करण्यासाठी फटाके विक्रीचे दुकान-स्टॉल लागलेल्या ठिकाणी प्रभाग समिती व अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करत आहेत. प्रभाग समिती ‘बी’ कार्यक्षेत्रात प्रभाग समिती व अग्निशमन केंद्र अधिकारी, कर्मचार्‍यांनी फटाके विक्रीचे दुकान-स्टॉल सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली असता यशवंत हाइट्स, सेंट्रल पार्क, नालासोपारा (पूर्व) या ठिकाणी एकूण ७ विनापरवानगी फटाके विक्रीचे दुकाने-स्टॉल आढळून आले. प्रभारी सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर यांनी संबंधित ७ दुकानदारांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर तुळींज पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संबंधित फटाके विक्री दुकाने-स्टॉल बंद करण्याची कारवाई महापालिकेमार्फत तातडीने करण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रभाग समितींमार्फत विनापरवाना फटाके विक्रीचे दुकाने-स्टॉल लावणार्‍यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. विनापरवानगी फटाके विक्री करणार्‍यांची माहिती महापालिकेला कळवावी. जेणे करून अशा विनापरवानगी फटाके विक्री करणार्‍यांवर कारवाई करता येणे शक्य होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -