घरपालघरमहापालिकेच्या रुग्णालयात चिकित्सा व चाचणी केंद्रच नाही

महापालिकेच्या रुग्णालयात चिकित्सा व चाचणी केंद्रच नाही

Subscribe

रुग्णांची होणारी होणारी आर्थिक लूट व आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता महापालिकेने या सुविधा तातडीने रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांत उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांना दिला आहे.

वसई : दोन हजार कोटींचे आर्थिक बजेट असलेल्या वसई- विरार महापालिकेच्या रुग्णालयांत व आरोग्य केंद्रांत आवश्यक चिकित्सा आणि चाचणी केंद्र नसल्याने महापालिकेचे डॉक्टर या चिकित्सा व चाचणी खासगी लॅबमधून करून घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडत आहेत. या चाचण्या रुग्णांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे असल्याने अशाप्रकारची चिकित्सा-चाचणी केंद्र महापालिका रुग्णालयांतच सुरू करावीत, अशी मागणी वसई शिवसेनेने केली आहे. रुग्णांची होणारी होणारी आर्थिक लूट व आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता महापालिकेने या सुविधा तातडीने रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांत उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांना दिला आहे.

वसई-विरार महापालिका तीन रुग्णालये व २१ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शहरातील जवळपास २४ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम करत आहे. जवळपास दोन हजार कोटींचे आर्थिक बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांत व आरोग्य केंद्रांत आवश्यक चिकित्सा आणि चाचणी केंद्र नाहीत. त्यामुळे महापालिकेचे डॉक्टर या चिकित्सा व चाचणी खासगी लॅबमधून करून घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडत आहेत.
अशा सूचना करताना महापालिकेचे डॉक्टर रुग्णांना काही ठराविक लॅब व चिकित्सा केंद्रांकडूनच या तपासण्या करून घेण्याकरता सूचवत असल्याचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अशा तक्रारींमुळे महापालिकेतील संबंधित डॉक्टरांचा यामागे काही तरी आर्थिक हेतू असावा, अशी शंका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे. याबाबतच्या तक्रारी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडे केलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आयुक्तांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.
विशेष म्हणजे २३ मार्च २०२२ च्या पत्रान्वये देशमुख यांनी स्वत: वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय, सोनाग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर व बायोकेमिस्ट्री अनुषंगिक चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती. मात्र आज अखेर सहा महिन्यांच्या कालावधीनंतरही महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्यस्तरावर याबाबत कार्यवाही झालेली नाही. किंबहुना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारींचा आलेख वाढत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मागील काही वर्षांत वसई-विरार शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच आरोग्य सुविधांच्या मागणीतही वाढ होत आहे. वसई व विरारच्या तुलनेत नालासोपारा परिसरात लक्षणीय प्रमाणात गरीब आणि गरजू नागरिकांची लोकवस्ती आहे. यातील बहुतांश नागरिक हे रोजंदारी, गृहउद्योग व नोकरीवर अवलंबून असलेले आहेत. परिणामी आरोग्य काळजीकरता आवश्यक असलेला खर्च करणे त्यांच्या खिशाला परवडणारा नाही. कित्येक नागरिक मुंबईतील नायर, सायन किंवा केईएम रुग्णालयांत उपचारार्थ दाखल होतात. यात त्यांची मानसिक, आर्थिक व कौटुंबिक फरफट होते.

शारीरिक अनेक सूक्ष्म तपासणींकरताही नागरिकांना खासगी रुग्णालये किंवा लॅबवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा चाचणीनिमित्ताने ही रुग्णालये व लॅब गरजू रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. हा आर्थिक भुर्दंड रुग्णांच्या क्षमतेपलीकडे असतो. रक्ततपासणी सारख्या छोट्या चाचणीही खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागत आहेत. ही अडचण लक्षात घेता वसई-विरार महापालिकेच्या विशेष करून नालासोपारा येथील रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर व बायोकेमिस्ट्री अनुषंगिक चाचणी सुविधा या रुग्णालयांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केलेली होती. दरम्यान, पुन्हा एकदा या तक्रारींतील गांभीर्य आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन आवश्यक चिकित्सा व चाचणी केंद्रांबाबत तातडीने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकेविरोधात जनआंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही सरतेशेवटी त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -