घरपालघरवसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सुरु

वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सुरु

Subscribe

या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली आहे. मात्र, जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत.

वसईः बहुचर्चित वसई-भाईंदर दरम्यान रो-रो फेरीबोट मंगळवारी सकाळपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार आहे. वसई ते भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालवली जाणार आहे. जान्हवी या फेरीबोटीची क्षमता 33 वाहने व 100 प्रवासी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली आहे. मात्र, जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत.

सध्या वसई-भाईंदर या भागातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना लोकल गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रो-रो सेवा सुरू झाल्याने येथील प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांतच फेरीबोटीने वसई-भाईंदर असा प्रवास करता येणार आहे. त्यानंतर भाईंदरहून पुढे मुंबई आणि ठाण्याला जाणेही सोयीचे होणार आहे. दररोज ही फेरीबोटी सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत दिली जाणार आहे. भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेल्या 0.8 सागरी मैल अंतर असलेल्या मार्गाचा वापर होणार असल्याने प्रवास वेळ कमी लागणार आहे. तर ओहोटीच्या वेळेला सुमारे दोन सागरी मैल अंतराचा मार्ग लागेल, असे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक कोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणार्‍या नागरिकांची वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

०००

श्रेयासाठी चढाओढ….

- Advertisement -

० रो-रो सेवेच्या शुभारंभासाठी बहुजन विकास आघाडी, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते, पदाधिकारी हजर होते. वसईत आमदार क्षितीज ठाकूर आपल्या समर्थकांसह हजर होते. तर भाईंदरकडे खासदार राजन विचारे आपल्या समर्थकांसह स्वतः हजर होते. तर भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊनच बोटीवर आनंदोत्सव साजर करत होते.

० आमदार क्षितिज ठाकूर यांनी रोरो सेवेसाठी २०१४ पासून पाठपुरावा केला होता. महापालिका हद्दीत वसई खाडीतून नायगाव ते पाणजू बेट मार्गे भाईंदर (जेसलपार्क) व घोडबंदर ब्रिज येथे आणि वैतरणा खाडीत मारंबळपाडा ते दातिवरे येथे रो-रो फेरी सेवा मुरु करण्याबाबत वसई विरार शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे, असे बविआ समर्थक सांगताना दिसत होते.

० देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, तत्कालिन जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलवाहतूक सेवा वाढवण्याकरता ‘सागरमाला प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत वसई-भाईंदर रो-रो सेवही सुरू करण्यात आलेली आहे, असा दावा भाजपचे पदाधिकारी करत होते.

० खासदारांनी पाठपुरावा केल्यानेच रो-रो सेवा सुरु झाल्याचा दावा खासदार राजन विचारे यांचे समर्थक करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -