Eco friendly bappa Competition
घर पालघर बोईसरकरांचा प्रश्न सुटणार केव्हा?

बोईसरकरांचा प्रश्न सुटणार केव्हा?

Subscribe

पालघर तालुक्यातील बोईसर शहर, तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या सरावली, खैरापाडा, बेटेगाव, कोलवडे,कुंभवली, सालवड आणि पास्थळ या ७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दैनदिन निर्माण होणार्‍या कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे.

बोईसर: बोईसर व तारापूर औद्योगिक परिसरात मागील २५ वर्षांपासून निर्माण झालेली घनकचरा विल्हेवाटीची समस्या अजून ही कायम आहे. अडीच लाख लोकसंख्येचा रोजचा जमा होणारा ३० टन कचरा टाकण्यास कायमस्वरूपी जागा उपलब्ध होत नसल्याने शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग जमा होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहेबोईसर व तारापूर परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे नागरिकरण वाढले असून परिसरातील ७ गावांना घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्येने ग्रासले आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ तसेच येथील सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्या तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महसूल विभागाने या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन केंद्रासाठी जागा उपलब्ध न केल्याने बोईसर व परिसरातील घनकचरा समस्येने उग्ररूप धारण केले आहे

पालघर तालुक्यातील बोईसर शहर, तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या सरावली, खैरापाडा, बेटेगाव, कोलवडे,कुंभवली, सालवड आणि पास्थळ या ७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दैनदिन निर्माण होणार्‍या कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे. रोजचा जमा होणारा जवळपास ३० टन ओला आणि सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत विभागांकडे आवश्यक यंत्रसामुग्री आणि सफाई कर्मचारी उपलब्ध नसल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपात हा कचरा सरावली येथील एका खासगी जागेवर टाकला जातो. मात्र या जागेची कचरा साठवणुकीची क्षमता मर्यादीत असल्याने एकूण जमा होणार्‍या कचर्‍यापैकी फक्त ५० टक्के कचर्‍याची विल्हेवाट लावणे शक्य होते. उर्वरित कचरा मोकळ्या जागांवर, रस्त्यांच्या कडेला व खैरापाडा मैदानात उघड्यावर टाकण्यात येत आहे. उघड्यावर टाकण्यात येत असलेला हा कचरा आठवडाभर उचलला जात नसल्याने कुजून परिसरात प्रचंड दुर्गंधी व रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

प्रकल्प राबविण्यास जागेची अडचण

बोईसर परिसरातील रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. त्यानुसार १९ डिसेंबर २०२२ रोजी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी सरावली ग्रामपंचायत हद्दीतील सध्या तात्पुरत्या स्वरुपात ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो ती ५ एकर क्षेत्रफळाची खासगी जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर हा प्रकल्प संपूर्ण तयार होऊन कार्यान्वित होईपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी व येणारे अडथळे दूर करण्यासाठी एक समिती नेमण्याचे देखील निश्चित करण्यात आले. बैठकीत संभाजीनगर जवळील वाळूंज येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून तो यशस्वीपणे राबविणार्‍या महिंद्रा वेस्ट टू एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या अधिकार्‍यांनी विस्तृतपणे सादरीकरण करून ३० टनांचा प्रकल्प राबविण्यासाठी १८ ते २० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली. मात्र प्रस्तावित संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जागा ही कोलवडे गावच्या जवळ असल्याचे कारण या ठिकाणी प्रकल्प राबविण्यास कोलवडे ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने हा विषय पुन्हा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

बोईसर परिसरातील कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे.संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तारापूर एमआयडीसी परिसरात आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी एमआयडीसी, महसूल विभाग आणि संबंधित सर्व ग्रापंचायती यांनी एकत्रित येऊन आवश्यक तोडगा काढणे आवश्यक आहे.

– जगदीश धोडी
मा.उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

- Advertisment -