घरराजकारणBJP Lok Sabha Candidate : शिवराज सिंह चौहान आणि कृपाशंकर सिंह यांना...

BJP Lok Sabha Candidate : शिवराज सिंह चौहान आणि कृपाशंकर सिंह यांना लोकसभेची उमेदवारी

Subscribe

भाजपाने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपाचे नेते, तर तीन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात असलेले कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : भाजपाचे पक्षश्रेष्ठी राजकारणात कधी कोणती खेळी खेळतील, हे लक्षात आले तर नवलच. आज शनिवारी (ता. 02 मार्च) सायंकाळी भाजपाकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित जागांसाठी मंथन सुरू असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. 34 केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, 28 महिला, 57 ओबीसी उमेदवारांची नावे भाजपाने जाहीर केली आहेत. परंतु, या सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे ती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या नावाची. यामागे कारणही तसेच आहे. (BJP Lok Sabha Candidate: Shivraj Singh Chauhan and KripaShankar Singh are candidates for Lok Sabha)

हेही वाचा… BJP First MP List : नवी दिल्लीत भाजपाची खेळी, सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी निवडणूक लढणार

- Advertisement -

मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी तेथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ‘मामा’ नावाने मतदारांमध्ये परिचित असलेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना काहीसे दूर ठेवले होते. पुन्हा सत्ता आल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले नव्हते. तेव्हापासून शिवराज सिंह चौहान यांचे राजकीय भविष्य काय असणार? याची चर्चा रंगली होती. परंतु, आता भाजपाने शिवराज सिंह चौहान यांना विदिशी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदापासून जरी दूर ठेवलेले असले तरी त्यांना दिल्लीत घेण्याचा निर्णयही घेतला आहे.

शिवराज सिंह चौहान यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे आभार मानले आहेत. “पंतप्रधान मोदी हे युगाचे आणि दूरदर्शी आहेत. त्यांनी भारताचा अभूतपूर्व विकास करून लोककल्याणाचा इतिहास रचला. आता विकसित भारताचा संकल्पही त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल. हा संकल्प पूर्ण करण्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मलाही मिळाली आहे. विदिशा लोकसभा मतदारसंघाशी माझे जवळचे नाते आहे. येथील जनतेने मला पाच वेळा खासदार म्हणून निवडून देऊन सेवेचे सौभाग्य दिले. पक्षाने पुन्हा एकदा याच कुटुंबाची सेवा करण्याची संधी दिली आहे.” अशा भावना त्यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

काँग्रेसच्या माजी नेत्यावर भाजपाची ‘कृपा’

भाजपाने उत्तर प्रदेशमधील 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण यामध्ये अशा एका नावाचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपाने लोकभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मुळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातील असलेल्या कृपाशंकर सिह यांना याच लोकसभेतून उमेदवारी जाहीर घोषित करण्यात आली आहे.

एके काळचे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. भाजपात गेल्यानंतर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये असताना कृपाशंकर यांच्याविरोधात कारवाईसाठी भाजपाचे नेते आग्रही होते. भाजपा आणि शिवसेनेने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अनेक आंदोलनेही केली होती. भाजपा नेते जवळपास दररोज कृपाशंकर यांच्याविरोधात पत्रके काढायचे. आता मात्र कृपाशंकर पक्षासाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत आणि भाजपानेच त्यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -