घररायगडरोहे - कोलाड रस्ता कामात मनमानी वृक्षतोड सुरुच, कारवाई कोण करणार?; स्थानिकांसह...

रोहे – कोलाड रस्ता कामात मनमानी वृक्षतोड सुरुच, कारवाई कोण करणार?; स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींचा सवाल

Subscribe

रोहे - कोलाड रस्त्याच्या रुंदीकरण कामात रस्त्याच्या बांधकामात सर्वकाही अलबेल आहेच, असे वाटत असताना मिळालेल्या संधीचा फायदा घेत या कामात अडथळा येणारी मोठमोठी झाडे तोडताना संबंधित ठेकेदार हा त्याच्या फायद्यासाठी सर्रासपणे लगतच्या सर्वच झाडांची कत्तल करत असल्याचे विदारक चित्र आहे. याबाबत चोहोबाजूंनी टिका होत असतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि रोहे वन परिक्षेत्र मात्र ठेकेदारावर कारवाई का करीत नाहीत?, असा सवाल स्थानिक जनता करीत आहे.

अमोल पेणकर: रोहे
रोहे – कोलाड रस्त्याच्या रुंदीकरण कामात रस्त्याच्या बांधकामात सर्वकाही अलबेल आहेच, असे वाटत असताना मिळालेल्या संधीचा फायदा घेत या कामात अडथळा येणारी मोठमोठी झाडे तोडताना संबंधित ठेकेदार हा त्याच्या फायद्यासाठी सर्रासपणे लगतच्या सर्वच झाडांची कत्तल करत असल्याचे विदारक चित्र आहे. याबाबत चोहोबाजूंनी टिका होत असतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि रोहे वन परिक्षेत्र मात्र ठेकेदारावर कारवाई का करीत नाहीत?, असा सवाल स्थानिक जनता करीत आहे. त्यामुळे शासनाच्या खात्यांतील कोणा अधिकार्‍यांचा ठेकेदारावर वरदहस्त तर नाही ना?, अशी चर्चा आहे. त्यामुळे आजही या मार्गावर काम पूर्ण झालेल्या ठिकाणीही वृक्षतोड करणारा ठेकेदार मनमानी करत झाडे तोडत आहे.झाडे ज्यांच्या जागेवर आहेत ते बांधकाम खाते आणि तोडण्याची परवानगी देणारे वन खाते यावर कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे यावर कारवाई कोण करणार? असाही सवाल स्थानिकजनता आणि पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
रोहे -कोलाड – मुरुड रस्त्याचे गेली अनेक वर्षे रखडलेले काम अखेर २०२२ साली सुरु झाले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या सर्वच प्रकारच्या प्रवासी व वाहनचालकांनी याचे स्वागत केले. मात्र जवळपास एक दशकाहून अधिक काळ चाळण झालेला हा मार्ग व्हावा, यासाठी सर्वच स्तरावर आंदोलने करत निवेदने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येत होती.त्या प्रत्येकवेळी निधीची उपलब्धता झाल्यानंतर हा मार्ग होणार अशी आश्वासने बांधकाम विभागाकडून देण्यात येत होती.यादरम्यान प्रामुख्याने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दास भक्तांसह अन्य सर्वच सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. यातील प्रतिष्ठानच्या भक्तगणांनी लावलेली झाडे स्वतः मेहनत घेत चांगली डेरेदार वाढविली. मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षारोपण बाबत योग्य मार्गदर्शन न केल्यामुळे आज ही झाडे नव्याने होत असलेल्या बांधकाम आणि रुंदीकरण यामध्ये अडथळा ठरु लागली.त्यामुळे आज झाडे तोडावी लागत आहेत. मात्र यामुळे बांधकाम विभाग, वन विभाग यांसह ही झाडे तोडणारे ठेकेदार यांना मात्र चांगलीच आर्थिक सुबत्तेची सावलीही झाडे तोडताना मिळत असल्याचे चित्र आहे.

कारवाईपासून दूर राहण्याचा प्रयत्न
बांधकाम विभाग वन विभागाकडून झाडे तोडण्याची परवानगी वन विभागाकडून घेत ठेकेदारास झाडे तोडण्यास सांगत आहे. मात्र ठेकेदार कोणती आणि किती झाडे तोडतोय ही जागेचा मालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याची तसदी घेताना दिसत नाही.त्यामुळे ठेकेदार मनमानीपणे झाडे तोडून त्यामधून निघालेल्या किट्याची परस्पर विल्हेवाट विट भट्टी आणि बेकरी येथे विक्री करून लाखो रुपये कमावत आहे.आजवर याबाबत अनेकदा पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी तक्रारी करत तोडलेल्या झाडांची वाहतूक करणारी वाहने पकडून दिली. मात्र बांधकाम खाते, झाडे ही आपली जबाबदारी नाही असे सांगते तर वन विभाग आम्ही फक्त झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदार कोणती आणि किती झाडे तोडतोय हे पाहणे बांधकाम विभागाचे काम असल्याची भूमिका घेत हात वर करून कारवाई पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

पर्यावरण मंत्रालयाने कारवाई करावी
एकूणच या तिघांच्या अभद्र आणि आर्थिक हितसंबध असलेल्या युतीमुळे कारण नसताना काही झाडांची कत्तल मात्र जैसेथेच पद्दतीने राजरोसपणे सुरु आहे. आधीच दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामध्ये झाडे तोडण्याची परवानगी घेताना एकास पाच झाडे लावणे बंधनकारक असताना आजपर्यंत बांधकाम विभागाने साधे एक झाड या मार्गावर वा अन्य ठिकाणी नव्याने लावलेले दिसत नाही. त्यामुळे आता तरी ही अनावश्यक वृक्षतोड थांबवा व आजवर झालेल्या वृक्षतोडीचा संपूर्ण पंचनामा करून दोषी असणार्‍या बांधकाम, वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांसह ठेकेदारावर पर्यावरण मंत्रालयाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सदर रस्त्याच्या कामासाठी अडथळा निर्माण करणारी परवानगी घेतलेली झाडेच तोडणे आवश्यक आहे. तरीही परवानगी पेक्षा अधिकची वृक्षतोड झाली असल्यास स्वतः पाहणी करून नियमबाह्य वृक्षतोड झाली असल्यास कारवाई करण्यात येईल.
– जगदीश सुखदेवे,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम खात्यास वन विभागाकडून परवानगी देण्यात आलेली झाडे तोडणे आवश्यक आहे. परवानगी अतिरिक्त वृक्षतोड होत असल्यास संबधीत ठेकेदारावर कारवाई करणे उचित राहील. मात्र जनतेच्या तक्रारींची दखल घेत या मार्गावर वेळोवेळी दिलेल्या परवानगी नुसार वृक्षतोड झाली असल्याची संपूर्ण पाहणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
– मनोज वाघमारे,
रोहे वन परिक्षेत्र अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -