घररायगडसावित्री नदीतील गाळ काढताना नियमभंग, मोठ्या प्रमाणात होतोय वाळूचा उपसा

सावित्री नदीतील गाळ काढताना नियमभंग, मोठ्या प्रमाणात होतोय वाळूचा उपसा

Subscribe

महाडमध्ये दरवर्षी येणार्‍या पुराच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी येथील सावित्री नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून जोमाने सुरु आहे. त्यातच महसूल प्रशासन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याने नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या वाळू काढून ती विकण्याचा गोरख धंदा जोमाने चालू आहे. नदीतील गाळ, वाळू काढताना सुर्यास्तानंतर गाळ काढण्याच्या कामाला मनाई असताना देखील सावित्री नदी आणि इतर उपनद्यांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

महाड – निलेश पवार

महाडमध्ये दरवर्षी येणार्‍या पुराच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी येथील सावित्री नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून जोमाने सुरु आहे. त्यातच महसूल प्रशासन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याने नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या वाळू काढून ती विकण्याचा गोरख धंदा जोमाने चालू आहे. नदीतील गाळ, वाळू काढताना सुर्यास्तानंतर गाळ काढण्याच्या कामाला मनाई असताना देखील सावित्री नदी आणि इतर उपनद्यांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
शहर आणि तालुक्यामध्ये सन २०२१ मध्ये महापुरामुळे अनेक ठिकाणी वित्त आणि जीवितहानी झाली होती. शहरातील असलेली पुराची कायम समस्या सोडवण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देत शासनाकडून करोडो रुपये मंजूर करून घेतले गेले. जलसंपदा विभागाच्या नियमांना बगल देत नद्यांमधून यांत्रिक साधनाने गाळ गोटे आणि रेती काढण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली. हा गाळ काढताना ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात नियमांचा भंग करत गाळ उपसा सुरू केला आहे शासनाच्या महसूल आणि जलसंपदा या दोन विभागांच्या कामावर दुर्लक्ष असल्याने वाटेल तसा गाळ उपसा केला जात आहे.
महाड शहराजवळून जाणार्‍या सावित्री नदीमध्ये शेडाव डोहापासून दादली, केंबुर्ली जवळील नदीपात्रात फेब्रुवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम जोमाने चालू आहे यासाठी किमान १०० ट्रक, जेसीबी, पोकलेन यंत्रणेच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ काढला जातो व काढलेला गाळ महाड शहराजवळील दादली, केंबुर्ली महाड येथील जलसंपदा विभागाच्या जागेत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मोकळ्या जागेत व महाड, नवेनगर येथील कोकण म्हाडाच्या जागेत सावित्री नदी मधून काढलेला गाळ काढून साठवला जात आहे. सावित्री नदी मध्ये दिवसा गाळ काढण्याचे व रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेती काढून ती परस्पर खाजगी विक्रेत्यांना विकण्याचा गोरख धंदा गाळ काढणार्‍या ठेकेदारांनी अवलंबिला आहे. त्यातच नदीपात्रातील गाळ काढून त्याची वाहतूक करताना ज्या डंपर मध्ये नदीपात्रातील गाळ काढून भरला जातो. त्याठिकाणी खातरजमा करणारी यंत्रणा नसल्याने किंबहुना ज्यांना गाळ काढण्याचे काम मिळाले आहे. सदर ठेकेदार सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार व मंत्र्यांच्या जवळची असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम महसूल यंत्रणा करीत आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली चोरीची रेती वाहतूक करणार्‍यांना शासकीय यंत्रणा देखील खुलेआमपणे साथ देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

किनारे आणि शेजारील शेती देखील धोक्यात
किल्ले रायगड येथे साजरा होणार्‍या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाड मधील तहसील व प्रांत कार्यालयातील अधिकार्‍यांसहित नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल विविध ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच पोलीस यंत्रणा या कामात व्यस्त असल्याने त्याचा फायदा गाळ काढणारा या ठेकेदार मंडळींनी घेतला आहे. गाळ काढणारे ठेकेदार गाळ काढण्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस रेतीची बेकायदेशीर वाहतूक करत आहेत, शिवाय नदीमध्ये उत्खनन करताना असलेल्या नियमांचा भंग करत आहेत. वाटेल तशा पद्धतीने यांत्रिक साधने नदीत वापरून खड्डे केले जात असल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. नदीच्या किनार्‍यालगत देखील खोदकाम केले जात असल्याने किनारे आणि शेजारील शेती देखील धोक्यात आली आहे. किनार्‍याची माती खोदकामामुळे ढासळून शेजारील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

पूर परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील महाड शहराला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी रात्री अपरात्री शहरात फिरते परिणामी नागरिकांना कायम त्यामुळे सतर्क राहावे लागते जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे महाड शहरासहित आजूबाजूला लागून असलेल्या गावांमध्ये सलग तीन दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. जुलै २०२१ च्या महापुरामुळे महाड शहरात जीवितहानी जरी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सावित्री नदी मधील गाळ काढून पूर परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -