घररायगडसुसज्ज इमारतीसह क्रीडांगण उपलब्ध करणार; नरेंद्र जैन यांची ग्वाही

सुसज्ज इमारतीसह क्रीडांगण उपलब्ध करणार; नरेंद्र जैन यांची ग्वाही

Subscribe

शासनाकडून निधी मिळत नसला तरी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या दोन वर्षांत दानशूर आणि परिसरातील मोठ्या कारखान्यांच्या सहकार्याने आणखी नव्या प्रशस्त इमारतीसह, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची निःसंदिग्ध ग्वाही शाळा समितीचे सभापती नरेंद्र जैन यांनी दिली आहे.

 

नागोठणे: शासनाकडून निधी मिळत नसला तरी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या दोन वर्षांत दानशूर आणि परिसरातील मोठ्या कारखान्यांच्या सहकार्याने आणखी नव्या प्रशस्त इमारतीसह, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची निःसंदिग्ध ग्वाही शाळा समितीचे सभापती नरेंद्र जैन यांनी दिली आहे.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील कै. अ. जे. जैन प्राथमिक, गु. रा. अग्रवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात तीन दिवस सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप बुधवारी झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात जैन बोलत होते. आज येथे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान असल्याचे सांगतानाच त्यांनी शिक्षक बजावत असलेल्या सेवेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तर प्रमुख पाहुणे पोलीस उप निरीक्षक नारायण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सैन्यात किंवा पोलिसात जाऊन देशाची, जनतेची सेवा करण्याचे, तसेच रायगड जिल्ह्यातून अद्याप आयपीएस अधिकारी झाला नसल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न करावा, असे कळकळीचे आवाहन केले. रोहे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, वणीच्या सरपंच प्रगती आवाद यांचीही समयोचित भाषणे झाली. मुख्याध्यापक तथा प्राचार्य एम. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisement -

रांगोळी, चित्रकला आणि विज्ञान प्रदर्शनाची प्रशंसा

यावेळी सरपंच डॉ. मिलींद धात्रक, भाई टके, अनिल काळे, जयराम पवार, विलास चौलकर, राजेंद्र जैन, अ‍ॅड. सोनल जैन, पिगोंडे सरपंच संतोष कोळी, कोंडगाव सरपंच कमल कळमकर आणि उपसरपंच अनंता वाघ, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे, ऐनघर सरपंच कलावती कोकळे, प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव, बाळासाहेब टके, बिपीन सोष्टे, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, सुनील लाड, भास्कर सोलेगावकर, रोहिदास हातनोलकर, रोशन पारंगे, शेखर जोगत यांच्यासह प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शेवाळे, कार्याध्यक्ष रमेश जेडगे, उपकार्याध्यक्ष प्रीती दरेकर, विद्यार्थी प्रतिनिधी विनय शिर्के, दक्षता पाटील, धनय बामणे, सृष्टी श्रीवर्धनकर, प्राध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या कार्याचे अहवाल वाचन करण्यात आले. पहिली ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विजेते ठरलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सुनील देवरे यांनी केले. तर देवरे यांच्यासह अमिता पाटील आणि मेघना म्हात्रे यांनी म्हटलेल्या वंदे मातरम्ने कार्यक्रमाची, तर स्नेहभोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली. दरम्यान, यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला आणि विज्ञान प्रदर्शनाची मान्यवरांसह सर्वांनी प्रशंसा केली.
.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -