घरक्रीडाCSK vs SRH: चेन्नईचा T-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम; 'असं' करणारा ठरला पहिला संघ

CSK vs SRH: चेन्नईचा T-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम; ‘असं’ करणारा ठरला पहिला संघ

Subscribe

CSK संघ T-20 मध्ये सर्वाधिक 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ बनला आहे. CSK ने 35व्यांदा T20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आणि या प्रकरणात इंग्लिश काउंटी क्लब सॉमरसेटला मागे सोडले, ज्याने 34 वेळा T-20 मध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

नवी दिल्ली:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. चेन्नईसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने 54 चेंडूत 98 धावांची खेळी केली आणि डॅरिल मिशेलसोबत शतकी भागीदारी केली, याच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने चमकदार कामगिरी करत चार गडी बाद केले आणि हैदराबादचा डाव 18.5 षटकांत 134 धावांवर आटोपला. हैदराबादकडून एडन मार्करामने 26 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. (CSK vs SRH Chennai s World Record in T-20 Cricket CSK are the team to score more than 200 runs most times in T-20 cricket)

सीएसकेची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

हैदराबादवर मोठ्या विजयासह, चेन्नईने गुणतालिकेत तीन स्थानांची मोठी झेप घेतली आणि पाच विजयांसह 10 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे, तर हैदराबाद संघ सलग दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

एकाच मैदानावर 50 हून अधिक सामने जिंकले

चेन्नई सुपर किंग्ज संघाने चेपॉक या मैदानावर 50 वा विजय नोंदवला. आयपीएलमध्ये कोणत्याही एका ठिकाणी 50 हून अधिक सामने जिंकणारा चेन्नई हा तिसरा संघ ठरला आहे. त्याआधी, मुंबई आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या संघांनीदेखील त्यांच्या घरच्या मैदानावर 50 हून अधिक विजयांची नोंद केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली आणि अवघ्या 40 धावांत तीन विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे तिन्ही विकेट तुषार देशपांडेने घेतल्या. या सामन्यात तुषारने आपल्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी करत हैदराबादच्या फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही. तुषार देशपांडेने पॉवरप्लेमध्ये चेन्नईला तीन यश मिळवून दिले. पहिल्या सहा षटकांत तीन बळी घेणारा तो या मोसमातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. तुषारपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्ट आणि संदीप वॉरियरनेही ही कामगिरी केली होती.

- Advertisement -

हैदराबादचा सर्वात मोठा पराभव

या सामन्यात हैदराबादचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. एडन मार्कराम वगळता त्यांच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हैदराबादची फलंदाजी इतकी खराब झाली आहे की, संघाचे पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत आणि संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि सर्वबाद झाला. त्यामुळे हैदराबादला आयपीएलच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी 2013 मध्ये चेन्नईने 77 धावांनी पराभूत केले होते, हा त्यांचा सर्वात मोठा पराभव होता.

भुवनेश्वर कुमारकडून हैदराबादला शानदार सुरुवात

तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला सुरुवातीचा धक्का दिला. रहाणे 12 चेंडूत नऊ धावा करून बाद झाला आणि संघाला दमदार सुरुवात करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. आयपीएलमध्ये किमान 150 चेंडू खेळल्यानंतर रहाणे चेन्नईसाठी सर्वात कमी सरासरी असलेला खेळाडू ठरला आहे. रहाणेची सरासरी 14.80 आहे जी चेन्नईकडून खेळताना कोणत्याही फलंदाजाची सर्वात कमी सरासरी आहे.

गायकवाड आणि मिशेल यांच्यात उत्तम भागीदारी

रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर रुतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी करत संघाला बरोबरीत रोखले. गायकवाडने या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले, तर डॅरिलही मागे राहिला नाही आणि आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. त्यानंतर जयदेव उनाडकटने डॅरिल मिशेलला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मिचेलने 32 चेंडूत 52 धावांच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर शिवम दुबेने गायकवाड याला चांगली साथ दिली. गायकवाडने दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळी सुरू ठेवली आणि सलग दुसरे शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला. मात्र, टी. नटराजनने गायकवाडला शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करून शतक करण्यापासून रोखले. गायकवाडने 54 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर धोनी मैदानात आला आणि चेन्नईच्या प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

शिवम दुबेची आक्रमक फलंदाजी

शिवम दुबेनेही आक्रमक फलंदाजी करत 20 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 39 धावा करून नाबाद माघारी परतला. दोन चेंडूंवर एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्यानंतर धोनीही नाबाद राहिला. गायकवाड आणि मिशेलच्या जोरावर सीएसकेला मजबूत धावसंख्या उभारण्यात यश आले. शिवमनेही जवळपास प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य करत चौथ्या विकेटसाठी गायकवाडसोबत 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या सामन्यातही हैदराबादचे गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत आणि सुरुवातीची लय त्यांना राखता आली नाही.

CSK हा T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ

गायकवाड, मिचेल आणि शिवम दुबे यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे CSK पुन्हा एकदा 200 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. चेन्नईने हैदराबादविरुद्ध डेथ ओव्हर्समध्ये 12.80 च्या रन रेटने धावा केल्या. यासह CSK संघ T-20 मध्ये सर्वाधिक 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ बनला आहे. CSK ने 35व्यांदा T20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आणि या प्रकरणात इंग्लिश काउंटी क्लब सॉमरसेटला मागे सोडले, ज्याने 34 वेळा T-20 मध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

(हेही वाचा: T-20 World Cup 2024: न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विल्यमसन कॅप्टन तर ‘या’ धाकड नावांचाही समावेश)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -