घरक्रीडाभारताचे लक्ष्य विजयी चौकाराचे!

भारताचे लक्ष्य विजयी चौकाराचे!

Subscribe

 विजयाच्या शोधात असणार्‍या अफगाणिस्तानविरुद्ध सामना आज

इंग्लंडमध्ये सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाचा सामना शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या दोन संघांची या स्पर्धेतील वाटचाल अगदी परस्पर विरुद्ध ठरली आहे. भारताने या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही, तर अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने ४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले असून, १ सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वात दुबळ्या मानल्या जाणार्‍या संघाविरुद्ध भारताला आपला चौथा विजय मिळवण्याची संधी आहे.

भारताचा या विश्वचषकात दुखापतींनी पिच्छा पुरवला आहे. शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी युवा रिषभ पंतची संघात निवड झाली आहे. त्यातच बुधवारी अष्टपैलू विजय शंकरच्या पायाला दुखापत झाल्याने पंतला थेट सामना खेळण्याची संधी मिळू शकेल. शंकर फिट होऊ शकला नाही आणि पंत किंवा अनुभवी दिनेश कार्तिकला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले, तर महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागू शकेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही धवन खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात केली. त्याने अर्धशतकी खेळी करताना रोहितसोबत १३६ धावांची सलामी दिली. आता धवन या संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने राहुललाच सलामीवीर म्हणून खेळावे लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध त्याला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. तसेच गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार डाव्या पायाच्या दुखापतीमुळे या आणि पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

- Advertisement -

भारताच्या फलंदाजांनी या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने दोन वेळा प्रथम फलंदाजी केली असून, या दोन्ही सामन्यांत ३०० हून अधिक फटकावल्या होत्या. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचे या स्पर्धेतील प्रदर्शन निराशाजनक आहे. राशिद खान आणि मोहम्मद नबी या अनुभवी फिरकी जोडगोळीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मागील सामन्यात इंग्लंडने त्यांच्याविरुद्ध ३९७ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारताचे या स्पर्धेत पहिल्यांदा ४०० हून अधिक धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य असेल. तसेच भारताच्या जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केली असून, त्यांना हार्दिक पांड्याचीही साथ लाभली आहे. त्यामुळे या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागू शकेल.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा.

- Advertisement -

अफगाणिस्तान : गुलबदीन नैब (कर्णधार), नूर अली झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, असगर अफगाण, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह झादरान, राशिद खान, इक्राम अलीखील (यष्टीरक्षक), दवलत झादरान, मुजीब उर रहमान, हजरतुल्लाह झझाई, समीउल्लाह शेनवारी, आफताब आलम, हामिद हसन.

कोहलीला विक्रमाची संधी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याला नवा विक्रम रचण्याची संधी आहे. कोहलीने या सामन्यात १०४ धावांची खेळी केली, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो २०,००० धावा पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा तो एकूण बारावा आणि भारताचा तिसरा (सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड) फलंदाज असेल. मात्र, तो सर्वात जलद २० हजार धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन या महान फलंदाजांच्या नावे असून, या दोघांनीही २० हजार धावा ४५३ डावांमध्ये पूर्ण केल्या होत्या. कोहलीने आतापर्यंत ४१५ डावांत (१३१ कसोटी, २२२ एकदिवसीय, ६२ टी-२०) १९८९६ धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -