घरक्रीडाउपांत्य फेरीचा मार्ग मोकळा ?

उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा ?

Subscribe

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा होऊन ३ आठवडे लोटले असून २६ सामने (४ सामने पावसामुळे वाया गेले) पार पडले आहेत. यजमान इंग्लंडसह गतवेळचा विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड तसेच विराट कोहलीचा अपराजित भारत या ४ संघांची उपांत्य फेरीकडे वाटचाल सुरु आहे. इंग्लंडमधील लहरी वातावरणाचा फटका बसू नये हीच सा-या क्रिकेटशौकिंनाची अपेक्षा व इच्छा असेल.

भारताप्रमाणेच केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ अपराजित आहे. न्यूझीलंड, भारत यांचे अनुक्रमे ९ आणि ७ गुण झाले असल्यामुळे त्यांना बाद फेरीत प्रवेश करणे कठीण जाणार नाही. ६ सामन्यांतून १० गुणांची कमाई करणारा अ‍ॅरॅान फिंचचा ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. भारताविरुद्ध एकमेव पराभव वगळता ऑस्ट्रेलियाने इतर प्रतिस्पर्धांवर सहज विजय मिळवले आहेत. क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर २५ जून रोजी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची झुंज रंगेल. याच मैदानावर २९ जूनला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन शेजार्‍यांमधील सामना होईल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने ६ पैकी ४ सामन्यांत त्रिशतकी मजल मारली असून वॉर्नरने एका वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन करताना यंदा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ४४७ धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हैद्राबादकडून खेळताना वॉर्नरने ६४२ धावा फटकावून ’पर्पल कॅप’चा मान पटकावला होता. हा किताब ’फ्ल्यूक’ नव्हता हेच त्याच्या कामगिरीवरुन सिद्ध होते. वॉर्नरप्रमाणे कर्णधार फिंच, उस्मान ख्वाजा यांनी फलंदाजीत सातत्य दाखवले असून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स या तेज जोडगोळीची प्रभावी, भेदक गोलंदाजी हे ऑस्ट्रेलिया संघाचे वैशिष्ट्य.

केन विल्यमसनच्या किवीजने ५ सामन्यांत ९ गुण मिळवले आहेत. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या तळाच्या संघांवर त्यांनी सहज विजय मिळवले. भारताविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाया गेला. शनिवारी ओल्ड ट्रॅफर्डवर किवीजचा सामना रंगेल जेसन होल्डरच्या विंडीजबरोबर. कर्णधार विल्यमसनच्या झुंजार शतकामुळे दक्षिण अफिकेचे आव्हान किवीजनी परतावून लावले. विंडीज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या बलवान प्रतिस्पर्ध्यांशी त्यांना मुकाबला करायचा असून ४ पैकी २ सामने जिंकल्यास न्यूझीलंडचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होईल.

- Advertisement -

यजमान इंग्लंडने ५ पैकी ४ सामन्यांत त्रिशतकी मजल मारताना ४ विजय संपादले, पण पाककडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. कर्णधार मॅार्गनने विक्रमी १७ षटकारांसह शतक झळकावले. जो रुटने या स्पर्धेत २ शतके फटकावली असून जेसन रॉय, जॉस बटलर यांनीही शतक झळकावले आहेत. इंग्लंडची फलंदाजी बहरत असताना गोलंदाजांचाही कामगिरी चांगली होत आहे. युवा तेज गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपल्या धारधार आक्रमणाने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत १५ मोहरे टिपले आहेत. लेगस्पिनर आदिल रशीदने मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून आपली उपयुक्तता दाखवली. क्षेत्ररक्षणातील ढिलाई इंग्लंडला परवडणारी नाही. पाकविरुध्दचा सामना त्यांनी गमावला तो गलथान क्षेत्ररक्षणामुळे. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध त्यांचे सामने बाकी असून त्यापैकी दोन सामने जिंकून यजमान संघाला आगेकूच करता येईल.

विराट कोहलीच्या भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत चांगली कामगिरी करुन आपला ठसा उमटवला आहे. सलामीवीर शिखर धवनच्या दुखापतीचा बाऊ न करता भारताने पाकिस्तानवर सफाईदार विजय संपादला. भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी, अष्टपैलूंची भरणा ही भारताची जमेची बाजू. सलामीवीर रोहित शर्माने २ शतके, एक अर्धशतक झळकावताना सातत्यपूर्ण खेळाला व्यावसायिकतेची जोड दिली आहे. धवन, रोहित ही भारताची बिनीची जोडी. धवनला दुखापत झाल्यामुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागले. रोहितने लोकेश राहुलच्या साथीने शतकी सलामी देत भारताला पाकविरुध्द भक्कम पायाभरणी करुन दिली. भारताने ४ पैकी २ सामन्यांत त्रिशतकी मजल मारली. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल (कुलचा) या फिरकी दुकलीने पाटा खेळपट्ट्यांवर अचूक गोलंदाजी करुन प्रतिस्पर्ध्यांना सतावले. स्पर्धेच्या उत्तरार्धात लहरी हवामानाचा फटका बसल्यास गुणतक्त्यात फेरबदल होतील अन्यथा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत या संघांचा बाद फेरीतील प्रवेश अटळ दिसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -