घरक्रीडाऐतिहासिक विजयाची संधी!

ऐतिहासिक विजयाची संधी!

Subscribe

भारत-न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना आज

विराट कोहलीच्या भारतीय संघाला बुधवारी न्यूझीलंडमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. भारताने अजून न्यूझीलंडमध्ये एकही द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकलेली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००८-०९ मध्ये झालेली मालिका ०-२ अशी, तर मागील वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने मालिका १-२ अशी गमावली होती. यंदा मात्र त्यांनी न्यूझीलंड दौर्‍याची अप्रतिम सुरुवात करत ऑकलंड येथे झालेले पहिले दोन टी-२० सामने जिंकले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे बुधवारी हॅमिल्टनच्या सिडन पार्कला होणारा तिसरा टी-२० सामना जिंकत कोहलीच्या संघाला न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका विजय मिळवण्याची संधी आहे.

भारताने मागील काही काळात टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघ पाच टी-२० मालिकांमध्ये अपराजित आहे. मात्र, या चांगल्या कामगिरीनंतरही जागतिक टी-२० क्रमवारीत भारत पाचव्याच स्थानी आहे आणि एका स्थानाची बढती मिळवायची असल्यास त्यांना न्यूझीलंडला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा लागेल. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापन क्रमवारीपेक्षा काही महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाचा विचार करत असून युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा फायदा लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांना झाला आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑकलंडला झालेले पहिले दोन्ही सामने भारताने सहजपणे जिंकले. भारताच्या या विजयांमध्ये राहुल आणि अय्यर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने पहिल्या सामन्यात ५६, तर दुसर्‍या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावरील अय्यरने पहिल्या सामन्यात आक्रमक अर्धशतक (२९ चेंडूत नाबाद ५८) झळकावले, पण दुसर्‍या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या सहा धावांनी हुकले. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला मात्र अजून आपली छाप पाडता आलेली नाही. त्याने दोन सामन्यांत मिळून केवळ १५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता तो आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक असेल.

भारताच्या या फलंदाजांना गोलंदाजांचीही उत्तम साथ लाभली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने द्विशतकी धावसंख्या उभारल्यानंतर दुसर्‍या सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा या भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडला अवघ्या १३२ धावांवर रोखले. त्यामुळे न्यूझीलंडला या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तिसर्‍या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलायन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रँडहोम, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बॅनेट, ईश सोधी, टीम साऊथी, ब्लेअर टिकनर.

सामन्याची वेळ : दुपारी १२.२० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -