घरक्रीडाभारताचा मालिका विजय

भारताचा मालिका विजय

Subscribe

कर्णधार कोहलीची पुन्हा शतकी खेळी

कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून मात केली. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा भारताचा परदेशातील सलग तिसरा मालिका विजय होता. विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्याची भारताची ही सलग नववी वेळ होती. या सामन्यात नाबाद ११४, तर मालिकेत दोन शतकांसह २३४ धावा करणार्‍या कोहलीला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर क्रिस गेल आणि इव्हन लुईस यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी अवघ्या १०.५ षटकांत ११५ धावांची भागीदारी केली. गेलने ४१ चेंडूत ७२ आणि लुईसने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. या डावाच्या २२ षटकांनंतर पावसाला सुरुवात झाल्याने हा सामना ३५ षटकांचा करण्यात आला. सामना पुन्हा सुरु झाल्यावर मोहम्मद शमीने शिमरॉन हेटमायरला २५ धावांवर आणि रविंद्र जाडेजाने शाई होपला २४ धावांवर माघारी पाठवले. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी जवळपास १३ षटकांत ५० धावांची भागीदारी केली. यानंतर निकलोस पूरन (१६ चेंडूत ३०) आणि कार्लोस ब्रेथवेट (१४ चेंडूत १६) यांनी फटकेबाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजने ३५ षटकांत ७ बाद २४० अशी धावसंख्या उभारली. मात्र, डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३५ षटकांत २५५ धावांचे आव्हान मिळाले.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा १० धावांवर धावचीत झाला. मात्र, शिखर धवन आणि कोहली यांनी दुसर्‍या विकेटसाठी जवळपास १० षटकांत ६६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचा ११ धावांवर किमो पॉलच्या गोलंदाजीवर शाई होपने झेल सोडला. या मिळालेल्या जीवदानाचा त्याने चांगलाच फायदा घेतला. शिखरला मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. डावखुरा फिरकीपटू फॅबियन अ‍ॅलनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो ३६ धावांवर बाद झाला. रिषभ पंत पहिल्याच चेंडूवर खराब फटका मारून खातेही न उघडता माघारी परतला. त्यामुळे मागील सामन्यात शतकी भागी करणार्‍या श्रेयस अय्यर आणि कोहलीवर पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आली.

या दोघांनी याचा दबाव न घेता १६ षटकांत १२० धावांची भागीदारी केली. कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अय्यरने त्याला अप्रतिम साथ देत ४१ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. हे त्याचे ९ सामन्यांतील चौथे अर्धशतक होते. मात्र, भारताला जिंकण्यासाठी ४३ धावांची गरज असताना त्याला किमार रोचने बाद केले. दुसरीकडे कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी सुरु ठेवत ९४ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४३ वे शतक होते. त्याने आणि केदार जाधवने उर्वरित धावा करत भारताला विजय मिळवून दिला. कोहलीने ९९ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने नाबाद ११४ धावा केल्या.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

वेस्ट इंडिज : ३५ षटकांत ७ बाद २४० (क्रिस गेल ७२, इव्हन लुईस ४३, निकलोस पूरन ३०; खलील अहमद ३/६८, मोहम्मद शमी २/५०) पराभूत वि. भारत : ३२.३ षटकांत ४ बाद २५६ (विराट कोहली नाबाद ११४, श्रेयस अय्यर ६५, शिखर धवन ३६; फॅबियन अ‍ॅलन २/४०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -