घरक्रीडारणबीर, सलमाननंतर स्नूकर खेळाडू मार्क विलियम्स आला टॉवेलवर!

रणबीर, सलमाननंतर स्नूकर खेळाडू मार्क विलियम्स आला टॉवेलवर!

Subscribe

बॉलिवूडचे कलाकार सर्रास बॉडी शो करतात. ‘सावरिया’ चित्रपटातील रणबीर कपूरचे टॉवेलवरील गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे. फिटनेस फंडा प्रचलित करणाऱ्या सलमान खानचा ‘मुझसे शादी करोगी’मधील टॉवेल डान्सही लोकप्रिय ठरला आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमात टॉवेलवर येऊन बसणे, असे चित्र पाहायला मिळणे दुर्मिळ. स्नूकर चॅम्पियन मार्क व्हिलियम्स सार्वजनिक कार्यक्रमात टॉवेलवर उपस्थित राहिल्याने सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काहींचे सेलिब्रेशन आपल्याला विचित्रही वाटू शकते. जिंकण्याचा आनंद अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करणाऱ्या मार्क विलियम्सने आपल्या कारकिर्दीतील तिसरी जागतिक पातळीवरील स्नूकर चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर चक्क अर्धनग्नावस्थेत टॉवेलवर पत्रकार परिषदेत हजेरी लावली. मार्कने असे करून दिलेला शब्द पाळल्याचे सिद्ध होते. होय, मार्कने स्वतःच स्नूकर चॅम्पियनशिप जिंकल्यास अर्धनग्न होऊन पत्रकार परिषदेत येऊ, असे म्हटले होते.

- Advertisement -

जागतिक स्तरावर चॅम्पियनशिप जिंकणारे मार्क हे डाव्या हाताने खेळणारे पहिले खेळाडू आहेत. स्नूकर खेळातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू मार्कने यापूर्वी २००० आणि २००३ मध्ये स्नूकर चॅम्पियनशिप पटकावली होती. तब्बल १५ वर्षांनंतर मार्कने हा मान मिळवला. यावेळी त्यांनी जॉन हिगिन्सला १८-१६ ने मात देत ही मालिका जिंकली. ४३ वर्षीय मार्क सर्वाधिक वयात चॅम्पियनशिप जिंकणारे दुसरे खेळाडू बनले आहेत. पहिल्या क्रमांकावर १९७८ साली मालिका पटकावणारे वेलशन रेय रीयरडॉन आहेत.

संपूर्ण पत्रकार परिषद त्यांनी फक्त टॉवेलवर बसून पार पाडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मार्क खूपच भावूक झाले. आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत त्यांनी माहिती दिली. आपल्या मनात अनेकदा हा खेळ सोडण्याचा विचार आला होता. मात्र पुन्हा स्वतःला सावरून त्यांनी खेळाकडे लक्ष वळवले. चॅम्पियनशिप जिंकण्याबाबत मार्कने आनंद व्यक्त केला.
भविष्यात आणखी उत्तमरित्या खेळून पुन्हा चॅम्पियनशिप पटकावण्याच्या तयारीत असल्याचे यावेळी मार्कने म्हटले. एवढेच नव्हे तर पुढच्या वेळी चॅम्पियन झाल्यास अशाच प्रकारे अर्धनग्न होऊन पत्रकारांना सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मार्कचा हा अवतार सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. मार्कने केलेल्या दाव्यानुसार, पुढील चॅम्पियनशिप जिंकल्यास ते पुन्हा पत्रकारांसमोर अर्धनग्न होऊन येणार असल्याने प्रेक्षकांना त्याच्या आगामी मालिकेची ओढ लागली आहे. मार्कच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -