घरक्रीडाराहुल, अय्यरची कामगिरी वाखाणण्याजोगी - लक्ष्मण

राहुल, अय्यरची कामगिरी वाखाणण्याजोगी – लक्ष्मण

Subscribe

भारतीय संघाने न्यूझीलंडचा तिसर्‍या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. भारताच्या या मालिका विजयात लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने पहिल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतके केली. तर पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणार्‍या अय्यरने दुसर्‍या सामन्यात ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने या दोघांचे कौतुक केले.

पहिल्या सामन्यात भारतासमोर २०४ धावांचे आव्हान होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवावा लागला. दुसर्‍या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला १३२ धावांवर रोखल्याने फलंदाजांना संयमाने खेळ करता आला. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे नेहमीचे मॅचविनर झटपट माघारी परतल्यानंतर राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी जबाबदारी खेळ करत भारताला विजय मिळवून दिला. या दोघांचीही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. राहुलमधील प्रतिभेबाबत कधीच शंका नव्हती.

- Advertisement -

मधल्या काही काळात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश आल्याने त्याने कसोटी संघातील स्थान गमावले. त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये परतून खूप मेहनत घेत आपल्या खेळात सुधारणा केली. त्याचेच त्याला आता फळ मिळत आहे. तसेच श्रेयसमध्ये सामन्यागणिक सुधारणा पाहायला मिळत आहे. तो आता भारतीय संघात स्थिरावत आहे आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वांनाच खूप प्रभावित केले आहे, असे लक्ष्मणने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -