Friday, May 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारतीय संघात संधी न मिळण्याच्या मुद्द्यावर सूर्याने सोडलं मौन

भारतीय संघात संधी न मिळण्याच्या मुद्द्यावर सूर्याने सोडलं मौन

Related Story

- Advertisement -

आयपीलनंतर आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जास्त चर्चेत राहिली आहे. BCCIने IPL2020 सुरू असतानाच संघ जाहीर केला. त्या संघात मुंबई इंडियन्सकडून कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सूर्यकुमार यादवला वगळण्यात आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. क्रिकेट तज्ज्ञांपासून ते चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली, पण सूर्यकुमार यादव स्वत: याबाबत काहीही बोलला नव्हता. अखेर त्याने एका मुलाखतीत या संघनिवडीवर मौन सोडले.

विक्रांत गुप्ता यांच्याशी संवाद साधताना सूर्याने संघात निवड झाली नाही तेव्हा काय मनात आले होते, कोणी कशाप्रकारे मदत केली याबाबत खुलासा केला आहे. “अगदी खरे सांगायचे तर माझी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड होईल, अशी माझी अपेक्षा होती. जेव्हा मला संघात स्थान मिळाले नसल्याचं समजले, तेव्हा मला खूपच खिन्न आणि उदास वाटले. त्या दिवशी मला सरावदेखील करता येत नव्हता. मला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यापासून नाकारण्यात आले आहे, ही भावनाच माझ्या मनातून जात नव्हती. संघातील खेळाडूंची नावे जाहीर झाली तेव्हा मी जीममध्ये होतो. माझ्यासोबत रोहित देखील होता. भारतीय संघात माझी निवड झाली नाही हे समजताच मी तसाच जीममधून निघून गेलो. त्यावेळी रोहित शर्मा त्याचे वर्कआऊट संपवून माझ्या जवळ आला आणि मला विचारले की, संघातून वगळल्याबद्दल वाईट वाटतेय का? त्यावर मी त्याला खरे उत्तरही सांगून टाकले होते. पण जे झाले ते झाले. आता मी संधीची वाट पाहतोय. माझी क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे. त्या वेळेचा सदुपयोग करून मी संघात स्थान मिळण्यासाठी आणखी प्रबळ दावेदार ठरेन. आताच्या देशांतर्गत स्पर्धा आणि पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मी नक्कीच चांगली कामगिरी करेन आणि निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेन,” असा विश्वास सूर्याने व्यक्त केला.

- Advertisement -

सुर्या पुढे म्हणाला की, मला त्यादिवशी सचिन तेंडूलकर यांनी मॅसेज केला होता. संघात खेळाडू निवडणे हे माझ्या हातात नाही. त्यामुळे त्याबाबतीत मी फारसा विचार करत नाही. मला सचिन तेंडुलकर पाजींनीही सांगितले आहे की तू तुझा खेळ खेळत राहा आणि धावा जमवत राहा. आता मी त्याच गोष्टीप्रमाणे वागतोय. मला मिळालेली प्रत्येक संधी मला चांगल्या कामगिरीसाठी वापरायची आहे. आता माझे लक्ष्य टी२० विश्वचषक स्पर्धेच्या संघात मिळवणे हे असणार आहे,” असेही त्याने स्पष्ट केले.

 

- Advertisement -