घरक्रीडातिरंगी मालिका : भारतासमोर इंग्लंडचे आव्हान!

तिरंगी मालिका : भारतासमोर इंग्लंडचे आव्हान!

Subscribe

यजमान ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या महिला संघांतील तिरंगी टी-२० मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियामध्येच २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत टी-२० विश्वचषक होणार असल्याने या तिरंगी मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने या मालिकेसाठी आणि विश्वचषकासाठी जवळपास एकच संघ निवडला आहे. त्यामुळे त्यांना आपला सर्वोत्तम संघ समजण्यासाठी या मालिकेचा फायदा होईल.

भारतीय महिला संघाने २०१७ एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी, तर २०१८ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, दोन्ही सामन्यांत त्यांना इंग्लंडने पराभूत केल्याने त्यांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग झाले. आम्हाला दबावात सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आल्याने आम्ही हे सामने गमावले, असे काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कबूल केले होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे महिलांमधील दोन सर्वोत्तम संघ मानले जातात आणि हे संघ तिरंगी मालिकेत नक्कीच भारतीय संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. मात्र, हा दबाव योग्यपणे हाताळल्यास विश्वचषकाआधी भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढेल.

- Advertisement -

तसेच या मालिकेत नवख्या रिचा घोष आणि शेफाली वर्माच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. एकही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसताना रिचाची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली. तिला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकेल. तसेच ९ सामन्यांत १४२.३० च्या स्ट्राईक रेटने २२२ धावा करणारी सलामीवीर शेफाली वर्मा या मालिकेतही चांगली कामगिरी करेल अशी भारताला आशा असेल.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, नुझत परवीन .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -