युवकांनी सामने जिंकवणे गरजेचे!

virat kohli
कर्णधार कोहलीचे उद्गार

विराट कोहलीच्या भारतीय संघाने २०१९ वर्षाची विजयी सांगता केली. या वर्षातील अखेरच्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजवर ४ विकेट राखून मात करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही जिंकली. भारताचा हा विंडीजवरील सलग दहावा मालिका विजय ठरला. या सामन्यात ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी केली. मात्र, त्यानंतर भारताने झटपट विकेट्स गमावल्या.

परंतु, कर्णधार कोहलीने ८१ चेंडूत ८५ धावांची खेळी करत संघाला विजयासमीप नेले. तो बाद झाल्यावर दबावाच्या स्थितीत रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूरने सातव्या विकेटसाठी ३० धावांची अभेद्य भागी करत भारताला विजय मिळवून दिला. हे दोघे संघाला सामना जिंकवून देतील असा कर्णधार कोहलीला विश्वास होता. तसेच युवकांनी आपल्या खेळात सुधारणा करत भारताला सामने जिंकवणे गरजेचे आहे, असेही कोहली म्हणाला.

आम्ही याआधी बर्‍याचदा मोठ्या धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे. त्यामुळे दबावाच्या परिस्थितीत संयम कसा राखायचा आणि दवाचा काय परिणाम होतो, हे तुम्हाला ठाऊक असते. तुम्हाला छोट्या भागीदार्‍या उभाराव्या लागतात. तसे केल्यास प्रतिस्पर्धी संघावर आपोआपच दडपण येते. मी बाद झाल्यानंतर इतरांनी आपला खेळ उंचावत आम्हाला सामना जिंकवून दिला याचा आनंद आहे. मी बाद झाल्यावर दुसर्‍या बाजूला असलेल्या जाडेजाकडे पाहिले. त्याच्यात मला आत्मविश्वास दिसला. त्याने आणि शार्दूल यांनी अखेरच्या तीन षटकांत उत्कृष्ट फलंदाजी करत सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले. मात्र, मैदानाबाहेरून सामना पाहणे फार अवघड होते, असे कोहलीने नमूद केले.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी यावर्षी अप्रतिम कामगिरी केली आहे. यंदा सर्वाधिक विकेट्स मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी (४२ बळी) अव्वल स्थानी, तर भुवनेश्वर कुमार (३३) पाचव्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाजांचे कौतुक करताना कोहली म्हणाला, कोणत्याही मैदानावर, कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार बरेच वेगवान गोलंदाज एकाच संघात असणे फार दुर्मिळ आहे. यंदा त्यांनी फिरकीपटूंपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे, जी फारच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्यांच्यामुळे आम्हाला परदेशात मालिका जिंकण्याचा विश्वास मिळाला आहे. आम्ही युवा खेळाडूंना आता जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांना आवडो वा न आवडो, पण या युवकांनी काही वर्षांत आम्हाला सामने जिंकवून देणे गरजेचे आहे.

२०१९ सर्वोत्तम वर्षांपैकी!

भारतीय क्रिकेटसाठी २०१९ हे सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते, असे विधान कर्णधार विराट कोहलीने केले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील ३० मिनिटे वगळता, आमच्यासाठी हे वर्ष खूप छान गेले. आम्ही पुढेही आयसीसीची स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करु, असेही कोहलीने सांगितले. भारताने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केली, अपवाद होता केवळ इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाचा. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभूत केल्यामुळे भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले.