घरमुंबईगाड्या धुण्यासाठी अग्निशमन वाहनांच्या पाण्याचा वापर

गाड्या धुण्यासाठी अग्निशमन वाहनांच्या पाण्याचा वापर

Subscribe

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून त्यांच्या खासगी गाड्या धुण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यातील पाण्याचा वापर करण्यात येत आहे. सदरील गाड्यांमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून गाड्या पाण्याने भरून ठेवलेल्या असतात. मात्र, याकडे अग्निशमन अधिकार्‍याचे दुर्लक्ष असल्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन विभागातील अग्निशमन दलाच्या गाडीचा वापर कर्मचारी स्वतःच्या चारचाकी, दुचाकी गाड्या धुण्यासाठी वापर करत असल्याचा प्रकार घडत आहे.अग्निशमन दलाच्या गाड्यामधून जास्त प्रेशरने पाणी येईल, अशी सोय असते. जास्त प्रेशरने पाणी आल्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर या गाडीतील पाणी पाईपमार्गे मारल्यावर आग लवकर आटोक्यात येते. परंतु, याच आग विझवणार्‍या गाडीचा वापर कर्मचारी स्वत:च्या खासगी दुचाकी, चारचाकी गाड्या धुण्यासाठी वापरत आहेत.

- Advertisement -

पाइप लावून मस्तपैकी भरपूर वेळ गाडी धुतली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. मीरा भाईंदर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी कपात सुरू आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. तर दुसरीकडे, इकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अग्निशमन विभागाचे कर्मचारी पाण्याचा व अग्निशमन गाडीचा गैरवापर करीत असल्याने पाणी वाया जात असून महापालिकेला मोठे नुकसान होत आहे. अग्निशमन गाडीचा वापर योग्य त्या कारणासाठी करण्यात यावा असा गैरवापर करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी मोठा गाजावाजा करून अग्निशमन दलाचे मुख्यालय नवीन इमारतीत सुरू करण्यात आले आहे. या इमारतीला स्व. कल्पना चावला अग्निशमन केंद्र असे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन होऊन चार महिने झाले तरी देखील मुख्यालयाच्या इमारतीला अद्यापपर्यंत नामफलक लावण्यात आलेला नाही.

- Advertisement -

वाहनांचा व पाण्याचा गैरवापराचा प्रकार होत असेल तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांना तात्काळ नोटीस काढण्यात येणार आहे.
—प्रकाश बोराडे, प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -