घरठाणेजगदाळेंना मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले क्लस्टरचे अर्थकारण महत्वाचे वाटले

जगदाळेंना मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले क्लस्टरचे अर्थकारण महत्वाचे वाटले

Subscribe

आनंद परांजपे यांचा घणाघात

शरद पवार यांनी जगदाळेंना राजकारणात नाव दिले, राजकारणातील महत्वाची पदे दिली; प्रेम दिले, आदर दिला, आपुलकी दिली. पण, त्याहून अधिक काही त्यांना शरद पवार हे देऊ शकले नाहीत. म्हणून घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लस्टरचे जे अर्थकारण दाखविले असेल तेच त्यांना अधिक महत्वाचे वाटले असेल. एका बाजूला शरद पवार यांनी त्यांना दिलेला मानसन्मान, पदे असताना जगदाळे यांनी ‘क्लस्टरचे अर्थकारण’ आपलेसे करुन पक्षांतर केले आहे. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता-करता त्यांना स्वत:चाच “ स्वयंविकास ” देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. म्हणूनच त्यांचे हे अर्थकारण त्यांना लखलाभ असो, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला.

हणमंत जगदाळे यांनी आपल्या तीन नगरसेवकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत आनंद परांजपे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आनंद परांजपे म्हणाले की, खरे तर क्लस्टरचा विषय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचाच आहे. त्यांच्याच संकल्पनेतून क्लस्टर डेव्हलपमेंट या शब्दाचा जन्म झाला. त्यांनीच आपल्या सरकारच्या विरोधात मोर्चा काढून ही योजना राबविण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी असलेल्या आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. कालांतराने त्याची नियमावली बनली. या सर्वात २०१४ ते २०१९ चा कालखंड गेला. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना सिडकोसोबत सामंजस्य करार झाला, अशी माहिती आहे. संजीव जयस्वाल हे ठामपाचे आयुक्त असताना क्लस्टरचे ४१ यूआरपी जाहीर झाले. त्यामध्ये ६० हेक्टरवर शास्त्री नगर, सहकार नगर आणि लोकमान्य नगरमध्ये ही योजना राबविण्याचे गृहीत धरण्यात आले. आपणाला जगदाळेंपेक्षा राजकारणाचा कमी अनुभव असेल. पण, एकदा शासनाने योजना जाहीर केल्यानंतर त्याभागातील नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे, यावर शासनाची योजना ठरत नसते. मग, तो राष्ट्रवादीचा असो, की शिवसेना-भाजपचा आहे; यावर शासनाचे धोरण ठरत नसते. त्यांनी काल जे वक्तव्य केले आहे की, क्लस्टरला अधिक गती देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा हात हातात घेतला आहे. जगदाळे यांनी आपल्या भाषणात ते बांधकाम व्यावसायिक असल्याचे म्हणाले. त्यामुळे त्यांना एफएसआय, टीडीआर जास्त कळत असेल. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता करता त्यांना स्वयंविकास देखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. याबद्दल बांधकाम व्यावसायिक म्हणून तेच सांगू शकतील. त्यांचे एसआरएचे अनेक प्रकल्प सुरु आहेत.

- Advertisement -

मध्यंतरी एका जागरुक ठाणेकराच्या माध्यमातून समजले होते की येऊरमध्ये त्यांची 24 बंगल्यांची योजना सुरु आहे. त्या प्रकल्पाला वनखात्याने परवानगी दिलेली नाही. हा प्रकल्प जिथे सुरु आहे; तो भाग संजय गांधी अभयारण्यामध्ये समाविष्ट होत असून पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकल्पामध्ये काही अटीशर्तींचा भंग झाल्याचेही वृत्तपत्रांमधून वाचले आहे. एखादेवेळेस होऊ शकते की, या संदर्भात नियुक्त समितीची पुढील वेळी बैठक होईल. बृहन्मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये दहा ते 12 शासकीय अधिकारी या समितीचे सदस्य असतात. या समितीच्या पुढील बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती आपणांसमोर येणारच आहे. पूर्वी, इकोसेन्सेटीव्ह झोन असल्याने त्याची परवानगी सीसीच्या वेळीच आणणे गरजेचे होते. आता ती प्लींथपर्यंत आणली तरी चालणार आहे. त्यामुळे हा एक प्रकल्पही मार्गी लागावा, अशी त्यांची मानसिकता असेल. आपणाकडे वनखात्याचे पत्र आहे; त्यामध्ये ११ जानेवारी २०२३ रोजी वनखात्याची बैठक झाली. या बैठकीमध्ये मौजे येऊर येथील हणमंत जगदाळे यांच्या बंगले बांधण्याच्या योजनेचाही समावेश होता.

येऊरच्या बंगल्यांबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांना अद्याप ना हरकत दाखला मिळालेला नाही. पण, आगामी मार्च महिन्यापर्यंत ही परवानगी मिळाली असेल. सबका साथ सबका विकास, जिसकी सरकार उसको एनओसी, असेच घडणार आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण, त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. येणारी निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढेल. फक्त एकच दु:ख आहे की, शरद पवार यांनी त्यांना राजकारणात नाव, सन्मान, पदे दिली. पण, त्यापेक्षा अधिक पवार त्यांना देऊ शकले नाहीत. म्हणून घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हणमंत जगदाळे यांना क्लस्टरचे अर्थकारण दाखविले असेल. ते अधिक त्यांना महत्वाचे वाटले असेल. त्यामुळेच या सर्व पक्षांतराचे सार असे आहे की, एका बाजूला शरद पवार यांनी त्यांना दिलेला सन्मान, पदे असतील तर दुसर्‍या बाजूला क्लस्टरचे अर्थकारण असेल. तर, जगदाळे यांना हे अर्थकारणच अधिक महत्वाचे महत्वाचे वाटले असेल. त्यांना ते लखलाभ! आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते ताकदीने ही निवडणूक लढवू. जनता आपला फैसला करेल.

- Advertisement -

शकुनी मामा हे आता ज्योतिषही बघतात का?
आपणाला माहित नव्हते की, शकुनी मामा यांचे महापौरपद गेल्यानंतर त्यांनी पार्टटाईम ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. काल ते म्हणाले की, मुंब्रा येथून डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा शेवट सुरु झाला आहे. आपणाला माहित नव्हते की ते ज्योतिष झाले आहेत; माझी त्यांना एवढीच विनंती आहे की, १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमित सुनावणी सुरु होत आहे. या १६ जणांमध्ये घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे १६ आमदार अपात्र ठरल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहितील का,; बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अस्तित्व राहिल का; वेळ अशी येईल का की त्यांना कमळाबाईमध्ये प्रवेश करुन आपली राजकीय वाटचाल करावी लागेल का; हे भविष्य त्यांनी आधी बघावे. असेही परांजपे म्हणाले. डॉ. जितेंद्र आव्हाड हे शिव, फुले,शाहू,आंबेडकरांच्या वैचारिक वारसा घेऊन शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वलंत नेतृत्व म्हणून राज्यभर काम करीत आहेत. त्यामुळे सत्तेमुळे आलेला अहंकार आणि माज आला असेल तर आपण देव बनलो नाही ना, असा समज करुन घेऊ नये. आपण जे तीन प्रश्न विचारले आहेत, त्यांचे भविष्य कथन त्यांनी आधी करावे. मुंब्रा विकास आघाडीचा निर्णय हा जनता घेईलच.

… तर पालिका आयुक्तांच्या विरोधात रस्त्यावर उतरु
डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आमदार निधीमधून विकासकामांची माहिती देणारे जे एलइडी स्क्रीन खारीगाव उड्डाणपुलाजवळ लावण्यात आले होते. त्यांच्यावर ठाणे महानगर पालिकेने कारवाई केली. संपूर्ण ठाणे शहरात सत्ताधारी आमदार आणि नगरसेवकांचे एलइडी लागलेले असताना, केवळ राजकीय विरोधक म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आमदार निधीतील एलइडी स्क्रीन पालिका काढणार सेल तर आयुक्त अभिजीत बांगर आणि पालिका अधिकार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आयुक्तांना माझा सवाल आहे की, राष्ट्रवादीच्या आमदार आणि नगरसेवकांना वेगळा न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदार-नगरसेवकांना वेगळा न्याय!, असे आयुक्त कधीपासून वागायला लागले आहेत असा सवालही उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व लादले, हा कांगावा
उद्धव ठाकरे हे आपल्यावर लादलेले नेतृत्व आहे, असे शिंदेगटाकडून बोलले जात आहे, याबाबत विचारले असता आनंद परांजपे यांनी १९९६ सालचे एक छायाचित्र पत्रकारांना दाखवून, ‘ १९९६ साली आपले वडील प्रकाश परांजपे हे खासदार म्हणून निवडून आलेे. त्यावेळी आनंद दिघे यांनी प्रकाश परांजपे यांना घेऊन मातोश्री गाठली होती. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्षही नसताना त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता. म्हणजेच आनंद दिघे आणि प्रकाश परांजपे यांनीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्यच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे हेच आहेत, हे त्या पिढीतील या दोन्ही जणांनी मान्य केले होते. त्यामुळे आजचे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील लोक काय बोलतात, याला आपण फारसे महत्व देत नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील लोक आता खोटं बोलत आहेत; हे या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांना फार सिरीयसली घेऊ नये
श्रीकांत शिंदे हे मुंब्रा येथे जाऊन काही उद्घाटने करीत आहेत, याबाबत विचारले असता,“ आपण श्रीकांत शिंदे यांना फार गांभीर्याने घेत नाही. ते काय म्हणतात, यापेक्षा 2024 च्या निवडणुकीत 2019 पेक्षा अधिक मताधिक्याने डॉ. जितेंद्र आव्हाड निवडून येतील. श्रीकांत शिंदे आणि शकुनी मामा यांना काय वाटतेय, यापेक्षा कळवा- मुंब्य्राच्या लोकांना काय वाटतेय, हे अधिक महत्वाचे आहे. काल त्यांनी जे वक्तव्य केले ते लोकांनाही आवडलेले नाही. जितेंद्र आव्हाडांच्या शेवटाला सुरुवात झालीय, हे वाक्य नागरिकांना आवडलेले नाही. यातून तुमची संस्कृती आणि तुमच्यावर झालेले संस्कार दिसून येत आहेत. तुमचा सत्तेचा माज दिसतो. सत्तेत असताना अधिक नम्र असावे; पण, येथे उलट चालले असून सत्तेचा , प्रशासनाचा, पोलिसांचा दुरुपयोग कधी केला जातो; तर जेव्हा जनाधार विरोधात जाते तेव्हाच दुरुपयोग केला जातो, असे आनंद परांजपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -