घरठाणेठाणेकरांचा ‘ठाणे भूषण’,‘गौरव, गुणीजन’ पुरस्काराने सन्मान

ठाणेकरांचा ‘ठाणे भूषण’,‘गौरव, गुणीजन’ पुरस्काराने सन्मान

Subscribe

ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्कारांचे वितरण

ठाण्याच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना “ठाणे भूषण”,ठाणे गौरव”व ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन सोमवारी गौरवण्यात आले. राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम)तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

चार युद्धाचे साक्षीदार असलेल्या शांताराम विश्राम शिंदे, कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. दिनकर देसाई, कृत्रिम तलावांच्या माध्यमातून हजारो लीटर पाण्याची निर्मिती करणारे आनंद भागवत, मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणारे अॅड दिपक दळवी, डॉ. नरेंद्र पाठक यांना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा मानाचा “ठाणे भूषण” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर,सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेता अक्षरफ शानु पठाण, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ व्यक्तींना ‘ठाणे गौरव’पुरस्कार तर ११९ व्यक्तींना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर शैक्षणिक,कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांचा विशेष क्रीडा पुरस्कार, कोविड काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेल्या डॉक्टरांचा देखील विशेष उल्लेखनीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

गणेशोत्सव स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देखील यावेळी पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यामध्ये गणेशोत्सव आरास स्पर्धा प्रथम क्रमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,द्वितीय क्रमांक जयभवानी मित्र मंडळ, तृतीय क्रमांक शिवगर्जना मित्र मंडळ, चतुर्थ क्रमांक श्रीरंग सहनिवास मंडळ,पाचवा क्रमांक नवतरुण मित्र मंडळ, सहावा क्रमांक जय भवानीसार्वजनिक उत्सव मंडळ,सातवा क्रमांक अमर मित्र मंडळ, आठवा क्रमांक शिवाई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर स्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर, द्वितीय क्रमांक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक चैतन्य मित्र मंडळ तसेच उत्कृष्ट मूर्तिकार प्रथम महादेव नंदिवकर, द्वितीय क्रमांक सुनील गोरे व तृतीय क्रमांक दिपक गोरे यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -