घरठाणेरुग्णालयातील डायलिसिस सेंटर तत्काळ सुरू

रुग्णालयातील डायलिसिस सेंटर तत्काळ सुरू

Subscribe

शिवसेनेचा दणका

शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) दणक्यामुळे आरोग्य प्रशासन नरमले असून शहापुर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणार्‍या समस्यांसंदर्भात उपोषणाचा इशारा देताच रुग्णालय प्रशासनाने गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले डायलिसिस सेंटर सोमवारी तातडीने सुरू केले. रिक्त पदांच्या भरतीसह रुग्णांना भेडसावणार्‍या इतर समस्या 15 दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन जानेवारीला होणारे उपोषण 15 दिवसांकरिता स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या तत्परतेच्या भूमिकेमुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस व आयसीयू युनिट धूळ खात पडले असल्याने त्याचा फायदा रुग्णांना मिळत नव्हता.तसेच दहा वैद्यकीय अधिकार्‍यांसह 21 पदे रिक्त, रुग्णवाहिकेची अनुपलब्धता, भंगार विक्री प्रकरण यामुळे शहापुर उपजिल्हारुग्णालयाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रुग्ण कल्याण समिती सदस्य हेमंत मोरे यांनी दोन जानेवारी ला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी शहापुर उपजिल्हारुग्णालयात तातडीने धाव घेऊन बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी, डॉ. गजेंद्र पवार, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य उपोषणकर्ते हेमंत मोरे यांसह या बैठकीस शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे, तालुकाप्रमुख बाळा धानके, सुभाष विशे, गणेश अवसरे आदी उपस्थित होते.
गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले डायलिसिस सेंटर आज सुरू करण्यात आले असल्याने आता रुग्णांची सोय झाली असली तरी डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी विलंब का झाला? याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी काशिनाथ तिवरे यांनी केली. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू झाली असून परीक्षेच्या निकालानंतर रिक्त पदे भरली जातील तसेच कंत्राटी तत्वावर डॉक्टर्स ची रिक्त पदे ही भरली जातील असे आश्वासन उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी दिले. 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊन खाजगी रुग्णवाहिकांचे फावले आहे.

- Advertisement -

याबाबत रात्री तपासणी करा, ऑडिट करा रुग्णांची गैरसोय होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्या अशा सूचना नांदापुरकर यांनी अधीक्षक भंडारी यांना दिल्या. यावेळी रुग्णवाहिकेत जीपीएस सिस्टीम चा वापर करावा अशी मागणी बाळा धानके यांनी केली. दरम्यान, भंगार विक्रीची प्रक्रिया रीतसर पार पडली असल्याचे भंडारी यांनी यावेळी स्पष्ट केले असले तरी या भंगार विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी हेमंत मोरे यांनी यावेळी केली. तसेच कोरोना कालावधीत शव विच्छेदन करणार्‍या सफाई कामगारांना अजूनपर्यंत मोबदला मिळालं नसल्याबाबत लक्ष वेधले असता त्यांना एका शव विच्छेदनासाठी पाचशे रुपये या प्रमाणे देण्याचे आश्वासन देण्यात आले. याव्यतिरिक्त रुग्णांना भेडसावणार्‍या समस्या 15 दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण 15 दिवसंकरिता स्थगित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -