घरठाणेवन विभागाच्या कॅमेर्‍यात बिबट्या कैद

वन विभागाच्या कॅमेर्‍यात बिबट्या कैद

Subscribe

शेरे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती

शहापूर । शहापूर तालुक्यातील शेरे परिसरातील गोंधली पाडा येथील बालाराम अंदाडे यांच्या मालकीचा खंडू नावाच्या कुत्र्याची शिकार 6 रोजी बिबट्याने केली होती. या घटनेमुळे या परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले होते. मात्र गेल्या आठ दिवसापासून बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत असलेल्या शेरे परिसरातील नागरिकांनी या बिबट्याला जेरबंद करावे यासाठी वन विभागाला साकडे घातले आहे. यादरम्यान 8 मार्च रोजी येथे राहणार्‍या कल्पेश मुंबईकर यांच्या मालकीचा काळ्या रंगाचा कुत्रा बिबट्याने तोंडात धरून नेत असल्याचे मनाली अंदाडे, संगीता पाटील या दोन गृहिणींनी प्रत्यक्ष पाहिले. तर हा बिबट्या 15 मार्च रोजी रात्रीच्या वेळी वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्याने शेरे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 3 ट्रॅप कॅमेरे आणि रेस्क्यू  पिंजरा देखील बसवण्यात आला आहे.

दरम्यान भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी बिबट्या जेरबंद करण्यासंबंधीत विचारणा केली. मात्र वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांची जुळवून न घेतल्याने हा वाद ही विकोपाला जाण्याची शक्यता होती. शेरे वनपाल साईनाथ साळवी यांच्या समय सूचकतेमुळे परिसरातील ग्रामस्थ यांनी हा वाद टाळला. वनपाल शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याचा शोध वन अधिकारी आणि वन कर्मचारी घेत आहेत. 15 मार्च रोजी गोंधली पाडा येथील ग्रामस्थांनी शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांची भेट घेऊन या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक कारणांखेरीज नागरिकांनी एकट्याने रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडू नये. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
– भाग्यश्री पोळे, सहाय्यक उपवन संरक्षक

वन विभागाच्या वतीने वन परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन परिसरात ठिकठिकाणी सावधान फलक, सूचना फलक लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वनविभागाच्या वतीने परिसरातील गावांमध्ये जनजागृती आणि रात्रीची गस्त सुरू आहे.
-शैलेश गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -