घरसंपादकीयओपेडमोदी-शहांच्या हंटरची कल्पनेपलीकडील किमया!

मोदी-शहांच्या हंटरची कल्पनेपलीकडील किमया!

Subscribe

प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असते, असे म्हणतात. त्यात आता ‘राजकारण’ हेही जोडण्याची गरज आहे. सध्याचे राजकारण बघता, नीती, निष्ठा, स्तर वगैरे सर्वच गोष्टी गुंडाळून ठेवल्या आहेत. पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांत राजकारणाव्यतिरिक्त एक वेगळे नाते होते, पण आता या सर्वांना एकत्र बांधणारा ‘काळा पैसा’ हे एकच सूत्र राहिले आहे. त्यामुळे कालचे चांगले मित्र असलेले आज वैरी बनले आहेत आणि कालचे वैरी आज मित्र बनले आहेत. हे केवळ मोदी-शहा या रिंगमास्टर जोडीमुळेच! एकमेकांवर टीकाटिप्पणी करताना सबुरीचा सल्लाही निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्वांना दिला आहे. हे सांगताना त्यांनी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा ‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों’, हा शेर ऐकवला.

देशात सर्वात मोठ्या उत्सवाची घोषणा झाली आहे. तब्बल 44 दिवस चालणार्‍या उत्सवात सर्वाधिक मनोरंजक असेल तो ‘राजकीय शिमगा’ अन् ‘बेडुक उड्या’. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने यावेळी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. एकूणच, सध्याचे वातावरण पाहता राजकीय चिखलफेक यावेळी जास्त होईल, असे दिसते. भाषेचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहेच, आता तो रसातळाला जातो का, ते पहायला लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगालादेखील याचा अंदाज आला असावा म्हणून केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, ‘व्यक्तिगत हल्ले टाळा’, असे आवाहन राजकीय पक्षांचे नेते तसेच कार्यकर्त्यांना केले आहे.

राजकीय नेत्यांना सबुरीचा सल्ला देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा ‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों’, हा शेर ऐकवला. सध्या राजकारणात खेळीमेळीचे कमी आणि वैराचे वातावरण पहायला मिळते. पूर्वी तसे नव्हते. हे खुद्द माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक किस्सा वाजपेयी यांनी सांगितला होता. त्यांनी थेट नेहरू यांना म्हटले होते की, तुमच्यात चर्चिलसुद्धा आहे आणि चेंबरलिनही! हे ऐकून पंडित नेहरू नाराज झाले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची एका बँक्वेटमध्ये भेट झाली, तेव्हा नेहरू यांनी वाजपेयी यांचे कौतुक करत सांगितले की, आज तुमचे भाषण जबरदस्त होते.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर काँग्रेसचे दिवंगत नेते पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेते असलेल्या वाजपेयी यांना तसाच सन्मान मिळाला होता. जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगासमोर पाठविलेल्या शिष्टमंडळात वाजपेयी यांचा समावेश होता. या शिष्टमंडळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद, ई. अहमद, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि हामिद अन्सारी होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. हे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही एकप्रकारे मान्य केले आहे. सध्या तर लगेचच मित्र आणि शत्रू बनण्याचा प्रकार जरा जास्तच सुरू आहे, असा राजकीय पक्षांना चिमटादेखील त्यांनी काढला. कालपरत्वे राजकारणाची दिशा आणि दशा बदलली आहे. राजकारणातील सभ्यता संपुष्टात येत चालली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा 1997 सालचा एक व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप विरोधी पक्षात आहे, तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे एकमेव खासदार असूनही रमाकांत खलप हे सरकारमध्ये आहेत, असे महाजन यांनी सांगितले होते, पण गेल्या 10 वर्षांतील भाजपची मानसिकता बदलली आहे. दोन्ही काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे सांगणार्‍या भाजपनेच आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून राज्यात सत्तांतर घडवून आणले.

या नव्या धोरणामुळे भाजप आता सर्कशीचा तंबू बनला आहे. दी ग्रेट बीजेपी सर्कस… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रिंगमास्टरच्या भूमिकेत आहेत. साम, दाम, दंड, भेद यांच्या चाबकाने सर्वांनाच एकत्र बसवण्याची किमया त्यांनी साधली आहे. ‘हाथी मेरे साथी’ या सुपरहिट चित्रपटातील राजेश खन्नाच्या सर्कशीमध्ये वाघ, सिंह या हिस्र प्राण्यांच्या पंगतीत शेळी, मेंढीही बसलेली दाखवलेली आहे. सध्याचे चित्र वेगळे काय? अर्थात, राजकारणात ना वाघ-सिंह राहिले आहेत, ना शेळी, मेंढी, पण कट्टर वैरी एकमेकांशेजारी बसले आहेत आणि ते दोघे मिळून तिसर्‍यालाच लक्ष्य करत असल्याचे चित्र बघायला मिळते. अगदी उदाहरण द्यायचे झाले, तर कोकणातील नेत्यांचे देता येईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, नारायण राणे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, नारायण राणे आणि विद्यमान राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांचे वैर सर्वश्रुत आहे, पण आता ते सर्व एका पंगतीत बसलेले दिसतात.

- Advertisement -

तुम्ही स्वत:हून गुलामी पत्करली की, फडफडण्याशिवाय काही करू शकत नाही. वरून कितीही सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवले जात असले तरी, दिसते तसे नसते, हेच खरे. बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांश वर दिसतो. या नऊ दशांश गोष्टी अशा असतात की, त्यांची वाच्यता जाहीरपणे करता येत नाही. केवळ ‘फेव्हिकॉलचा जोड आहे’ असे म्हणावे लागते, पण त्याचा तकलादूपणा न सांगताही दिसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीत वेगळे काय घडत आहे. आजमितीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकच खासदार आहे. 2019 च्या निवडणुकीत किती जागा लढविल्या, हा मुद्दा सोडून दिला तरी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेनेच्या वाट्याला 8 ते 10 जागा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कमाल 10 जागा मिळतील असे गृहीत जरी धरले तरी, शिंदे समर्थक उर्वरित 3 खासदारांचे काय? अजित पवार यांना 3 ते 4 जागा भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांचा विचार करता अजित पवार फायद्यात आहेत, असेच म्हणावे लागेल.

अजित पवार आज सुपात आहेत, पण लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यावेळी त्यांना खरा झटका लागण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या लोकसभा निवडणुकीत 400चा टप्पा पार केला, तर 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या लोकसभा निवडणुकीनंतर जागावाटपाच्या मुद्यावर भाजपने शिवसेनेबरोबरची 25 वर्षांची युती तोडली होती. असाच विश्वास भाजपमध्ये यंदा पुन्हा निर्माण झाला, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? गेल्या वर्षी सत्तेत सहभागी झाल्यानंतर लगेचच घेतलेल्या एका बैठकीत अजित पवार यांनी 71 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रण यांनी केला आहे, तर शिवसेनेच्या बंडाळीत साथ देणार्‍या 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, पण लोकसभेतच कोंडी झालेली असताना विधानसभा निवडणुकीत काय?

आपला बाणा सोडून सत्तेसाठी तडजोड करावी लागते. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे एक वाक्य आहे – ‘निसर्गाची म्हणा, नियतीची म्हणा, एक फार मोठी किमया आहे. ती माणसाला कोणत्या तरी दालनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते आणि त्याचा दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसर्‍या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, क्षुद्र करून सोडते. एका माणसाला छोटा करून ती दुसर्‍याला मोठा करीत नाही, तर एकाच माणसाला ती इथे छोटा, तर तिथे मोठा करते…’ सध्या महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांबाबत दुसरे काय घडत आहे. मंत्रीपदाची इच्छा असलेल्या सहकार्‍यांना आता मंत्रीपद देता येत नाही, खासदारकी अन् आमदारकीचे तिकीट देता येत नाही आणि तिकीट देता आलेच, तर त्यांना निवडून आणता येईल याची खात्री नाही. अशी स्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची झाली आहे.

‘अब की बार चारसौ पार’चा नारा वास्तवात उतरविण्यासाठी भाजपची जमवाजमव सुरू आहे. याच माध्यमातून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी कदाचित चारसौ पार जाईलही, पण खरा कस लागणार आहे तो दक्षिणेत. भारताच्या दक्षिणेकडील प्रादेशिक पक्षांच्या तटबंदीला खिंडार पाडण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारत राष्ट्र समितीच्या विधान परिषद सदस्य आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांच्याविरुद्ध ईडी कारवाई सुरू झाली आहे. अशा प्रकारे जरी दक्षिणेत पाय रोवता आले, तर या ‘चारसौ पार’चा खरा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -