घरठाणेनिकषात बसत असतानाही मराठ्यांना आरक्षण का दिले नाही?

निकषात बसत असतानाही मराठ्यांना आरक्षण का दिले नाही?

Subscribe

मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे, तसेच मराठा आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आरक्षण देण्यापासून मराठा समाजाला वंचित ठेवून आरक्षण असतानाही ते दिले का नाही? असा प्रश्न मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत सरकारला केला. आरक्षणाचा कुठलाही निकष न पाळता अनेक जातींना आरक्षण दिले गेले, असे सांगून जरांगे पाटील यांनी मराठ्यांनी आरक्षणासंदर्भात सर्व निकष पार करूनही मराठ्यांना आरक्षण दिले गेले नसल्याचे म्हटले आहे. एखाद्या जात समुहाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हायचे असल्यास ही जात मागासवर्गीय प्रवर्गात असावी लागते, असे सांगत जरांगे पाटील म्हणाले की तर आणि तरच त्या जातीचा आणि समुहाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होत असतो. इतर जात समूह आरक्षणात गेल्यात त्यातील एकही जात मागासवर्गीय म्हणून सिद्ध करण्यात आलेली नसल्याचे सांगून जरांगे पाटील म्हणाले की 1967 ला आरक्षण दिले गेले. मात्र व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या गेल्या आणि आरक्षणही त्या बदल्यात दिले गेले. मात्र कोणाचेही मागासलेपणा आतापर्यंत सिद्ध केला गेला नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
मंडल आयोगाला प्रामुख्याने तीन कामे सांगण्यात आल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, जात ओबीसी आरक्षणात टाकायची झाल्यास तिचा सर्वे करा, जातीची यादी तयार करा, ओबीसीची जनगणना करा, ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या आहेत त्या जाती मागासवर्गीय म्हणून सिद्ध करा, असे सांगत जरांगे पाटील म्हणाले की एकही काम व्यवस्थित न करता मंडल आयोगाने 1923 ची यादी उचलून इंग्रजांनी केलेली जनगणना जशीच्या तशी घेऊन तो अहवाल तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारकडे सादर केला.

‘त्यांचा’ मागसलेपणा सिद्ध केलेला नाही
मंडल आयोगाने ओबीसींची संख्या 28 टक्के दाखवली आणि ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिले गेले. मागासलेपणा मात्र कोणाचाही सिद्ध केला नाही. जरांगे पाटील यांनी घटनेचा उल्लेख करीत लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले. पुरावे नसल्याने मराठ्यांना आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले जाऊ लागले, मात्र पुरावे असतानाही काही ओबीसी नेत्यांच्या प्रचंड दबाव सरकार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांचे जातीचे पुरावे नसल्याचे अहवाल सादर करण्यास भाग पाडल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisement -

पुरावे कोणी लपवले?
पुरावे असताना बुडाखाली पुरावे लपवून ठेवल्याने आरक्षणापासून आम्हाला वंचित राहावे लागले. मात्र आता शासनाने समिती गठीत केल्याने राज्यात लाखोंच्यावर मराठ्यांबाबत पुरावे सापडू लागले आहेत, नोंदी सापडूनही मराठ्यांना आरक्षण का लागू केले नाही? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शासनास उपस्थित केला आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
सकल मराठा समाजातर्फे कल्याण पूर्व येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित केली होती. एकच मिशन मराठा आरक्षण या टॅग लाईन खाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी सभा रात्री तब्बल साडे अकरा वाजता सुरू होऊन सव्वा बारा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाने समाप्त करण्यात आली. या सभेला पोलिसांनी दहा वाजेपर्यंत ची परवानगी दिली होती मात्र अन्य ठिकाणीही जरांगे पाटील यांची सभा सुरू असल्याने ते कल्याण पूर्वेत रात्री साडेअकरा वाजता त्यांचे आगमन झाले. आयोजकांना दिलेल्या परवानगीपेक्षाही जास्त वेळ सभेसाठी घेण्यात आल्याने याबाबत आयोजकांवर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -