घरमहाराष्ट्रशिवसेनेचे ४५ आमदार सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात - संजय काकडे

शिवसेनेचे ४५ आमदार सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात – संजय काकडे

Subscribe

शिवसेनेच्या ४५ आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून सत्तास्थापनेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला सत्तेत सहभागी करून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केला आहे.

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसेलेली असताना ज्या विजयी आमदारांच्या जोरावर शिवसेनेनं भाजपला खिंडीत गाठलंय, त्यातल्याच ४५ आमदारांना काहीही करून भाजपसोबत सत्तेत यायचं असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना हा दावा केला आहे. ‘काहीही करा, पण आम्हाला पदरात घ्या’, अशी मागणीच या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचं देखील संजय काकडेंनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘आम्हाला सत्तेसाठी दुसऱ्या पर्यायांची निवड करायला भाग पाडू नका’, असं सूचक वक्तव्य करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या चर्चांना सुरुवात करून दिली आहे.

शिवसेनेच्या आमदारांची भाजपला विनंती?

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेनं लावून धरलेली आहे. मात्र, ‘शिवसेनेच्या नवनिर्वाचित ५६ आमदारांपैकी ४५ आमदार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या काही प्रमुख प्रतिनिधी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या वाटाघाटी लवकरात लवकर करून सत्ता स्थापन करा’, अशी विनंती केल्याचं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एकीकडे भाजपकडून असे दावे केले जात असताना शिवसेनेकडूनही भाजपचे ५० आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाशिवसेना सत्तेसाठी भाजपशिवाय इतर पर्यायांच्या तयारीत?

बहुमत देऊनही युतीत सत्तास्थापनेच्या हालचाली नाहीत

दरम्यान, निकाल लागून ५ दिवस उलटले, तरीही राज्यात सत्तास्थापनेचं चिन्ह दिसत नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. १६१ जागा युतीला मिळून देखील अद्याप सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं कोणतंही पाऊल उचललं गेलेलं नाही. दोन्ही पक्ष एकमेकांना हूल देत असताना त्यांना निवडून देणाऱ्या जनतेच्या हाती मात्र फक्त बघत राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -