घरमुंबईतरेंच्या घरवापसीने बोईसरमध्ये बविआ अडचणीत

तरेंच्या घरवापसीने बोईसरमध्ये बविआ अडचणीत

Subscribe

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछाडीनंतर आमदार विलास तरे यांनी अचानक शिवबंधन बांधून शिवसेनेत घरवापसी केल्याने बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपचे आव्हान बविआला पेलणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.

बोईसर विधानसभा मतदारसंघ पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून 2009 च्या पुनरर्चनेनंतर नव्याने निर्माण झाला. 2014 च्या निवडणुकीत सेना-भाजप विरोधात लढले होते. तसेच वसईतील मते निर्णायक ठरत असल्याने बविआसाठी हा मतदारसंघ तसा सोपा होता. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या विलास तरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत बविआत प्रवेश केला. तेव्हापासून दोन्ही निवडणुकीत तरे निवडून येत आहेत. 2009 च्या निवडणुकीत विलास तरे यांनी शिवसेनेचे सुनील धानवा यांचा 13 हजार 578 मतांना पराभव केला होता.

- Advertisement -

त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अविनाश सुतार यांनी बंडखोरी करीत मनसेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुतार यांना 18 हजार 149 मते मिळाली होती. तसे पहिले तर सुतार यांच्या बंडखोरीने सेनेचा पराभव घडवून आणला होता. 2014 च्या निवडणुकीत सेना-भाजप विरोधात लढल्याने आमदार तरे यांचा विजय सोपा झाला होता. तिरंगी लढतीत तरे यांना 64 हजार 530 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे कमलाकर दळवी यांना 51 हजार 677 आणि भाजपचे जगदीश धोडी यांना 30 हजार 228 मते मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीनंतर बविआची बोईसर मतदारसंघावरील पकड हळूहळू ढिली पडत चालली होती. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला. शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघात 38 हजार 172 मताची आघाडी घेतली होती. त्याचवेळी तरे यांच्या खुर्चीला हादरा बसला होता. पण, त्याआधीच तरे यांचा बविआशी दुरावा निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीत तरे गेल्याची चर्चा होती. त्यामुळे तरे भाजपमध्ये जातील अशी एक अटकळ होती. पण, हा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तरेंनी आपला मार्ग बदलला. 25 ऑगस्टला मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन करीत शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लयानेच तरे शिवसेनेत गेल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

तरे शिवसेनेत आल्यानंतर सेनेतील काही स्थानिक नेत्यांनी विरोधाचा सूर लावला आहे. त्यामध्ये जगदीश धोडी आघाडीवर आहेत. 2014 ची निवडणूक धोडी भाजपमधून लढले होते. त्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केला होता. ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांचे निकटवर्तीय असलेल्या धोडी यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. धोडी यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. पण, तरेंना मातोश्रीवरून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने विरोधाची धार बोथट झाली आहे.

तरेंच्या जाण्याने बविआला मात्र मोठा हादरा बसला आहे. युतीला टक्कर देईल असा उमेदवार नाही, मतदारसंघातील कमी झालेली ताकद आणि घटलेली मते यामुळे बविआचे टेन्शन वाढले आहे. बविआ काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत आहेत. महाआघाडीने बोईसर बविआसाठी सोडलेला आहे. बविआ पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, माजी सभापती राजेश पाटील, विष्णू कडव यांची नावे चर्चेत आहेत. शेवटच्या क्षणी माजी खासदार बळीराम जाधव यांना मैदानात उतरवले गेले तर आश्चर्य वाटणार नाही.

तरेंच्या घरवापसीने बोईसरमध्ये बविआ अडचणीत
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -