घरमुंबईयुतीवर ईशान्य मुंबईचे चित्र अवलंबून

युतीवर ईशान्य मुंबईचे चित्र अवलंबून

Subscribe

1971 पासून हा मतदार संघ लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा कोणत्याही पक्षाला जिंकता आला नाही. परंतु सध्या देशात सुरू असलेल्या मोदी लाटेमुळे 2014 व 2019 मध्ये भाजपने हा मतदार संघ सलग दोनवेळा जिंकण्यात यश मिळवले. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये विधानसभेचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. ईशान्य मुंबईमधील सहाही मतदारसंघातील भाषिक वर्चस्वामुळे शिवसेना, भाजप यांचे पाच मतदारसंघात वर्चस्व आहे. या वर्चस्वाला सध्या तरी कोठेही धक्का मिळेल अशी शक्यता नाही, त्यामुळे सर्वच मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, युती तुटली तर मात्र या मतदारसंघातील चित्र बदललेले पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ईशान्य मुंबई मतदार संघामध्ये मुलुंड, विक्रोळी, भांडप (पश्चिम), घाटकोपर (पश्चिम), घाटकोपर (पूर्व) व मानखुर्द, शिवाजी नगर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहाही मतदारसंघांतील असलेल्या लोकवस्तीचा प्रभाव दरवेळी मतपेट्यांमध्ये दिसून येतो. मुलुंडमध्ये मराठी व गुजराथी भाषिक मोठ्या प्रमाणात असल्याने भाजप व शिवसेनेचा नेहमीच या मतदारसंघात वरचष्मा दिसून येतो. पण त्यातही मुलुंड हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांनी हा मतदारसंघ उत्तमपणे बांधला आहे. सरदार तारासिंग यांचे काम व भाजपचा बालेकिल्ला यामुळे भाजपसाठी हा पेपर नेहमीच सोपा गेला आहे. तारासिंग सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. परंतु, मोदी लाटेचा फायदा उचलण्यासाठी भाजपमधील अनेकजण उत्सुक असून, त्यांनीही यावेळी उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे फारसे वर्चस्व नसले तरी मनसेने या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केल्यास तारासिंग यांना कडवी झुंज द्यावी लागेल. मुलुंडमधील मराठी मतदार हा नेहमीच मनसेच्या मागे उभा राहिला आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे भाजपचा बालेकिल्ला असलेला घाटकोपर पूर्व हा मतदारसंघात ही गुजराथी भाषिक मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपचा हा बालेकिल्लाच समजला जातो. या मतदारसंघातून गृह राज्यमंत्री प्रकाश मेहता सलग सहावेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपला झुंज मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. तसेच घाटकोपर पश्चिम या मतदारसंघामध्ये राम कदम यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कीर्तन-भजनाच्या माध्यमातून या परिसरातील सर्वसामान्यांपर्यंत ते पोहचले आहेत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांची मने जिकंली आहेत. या मतदारसंघामध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या अधिक असल्याचा फायदा राम कदम यांना होत आहे. राम कदम यांनी मनसेमध्ये असताना येथील मराठी भाषिकांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतर या भागामध्ये राम कदम यांनी आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे.

विक्रोळी हा मतदारसंघ पूर्णत: मराठी भाषिक असल्याने येथे शिवसेना व मनसेचे वर्चस्व दिसून येते. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या विजयाची खात्री असल्याची बोलले जात असले तरी मनसेने या मतदारसंघातून आपला उमेदवार दिल्यास सुनील राऊत यांच्यासाठी हा पेपर अवघड ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भांडुप पश्चिम या मतदारसंघातही शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार अशोक पाटील सलग दोनवेळा निवडून आले आहेत. त्यांनी माध्यमातून त्यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. तसेच या मतदारसंघातून अन्य पक्षातून फारसे तगडे उमेदवार नसल्याने शिवसेनेची ही जागा कायम असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

ईशान्य मुंबईतील तीन मतदारसंघांवर भाजपचे तर दोन मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु, मुस्लिमबहुल असलेल्या मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात समाजवादी काँग्रेसचे अबु आझमी यांची पकड आहे. गत निवडणुकीत शिवसेनेचे बुलेट पाटील यांनी अबु आझमी यांना घाम फोडला होता. त्यामुळे यावेळी शिवसेना हा मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची शक्यता आहे. परंतु, यावेळी काँग्रेस व समाजवादी पक्ष एकत्र असल्याने अबु आझमी यांना विजयाची खात्री असल्याचे बोलले जात आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -