घरमहाराष्ट्रशरद पवारांचं राजकारण संपणार नाही - नवाब मलिक

शरद पवारांचं राजकारण संपणार नाही – नवाब मलिक

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करताना ‘शरद पवारांचं राजकारण आता संपलंय’, अशी बोचरी टीका केली होती. त्या टिकेला सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शरद पवार यांचं राजकारण संपणार नाही’, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. मुंबईत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे उत्तर दिलं. त्यासोबतच शरद पवार यांचे दाऊद गँगसोबत संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला देखील नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं असून दाऊद गँगचे गुंडच भाजपचे खासदार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. ब्रिजभूषण चरणसिंग हे दाऊद गँगचे सदस्य भाजपचे गोंडा मतदारसंघातून खासदार आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जाहीरनामा जाहीर केला जाणार होता. मात्र आता हा जाहीरनामा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावतीने संयुक्तरित्या जाहीर केला असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ‘पवार साहेबांचं राजकारण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालतं. तर फडणवीस यांचं राजकारण गोळवलकर यांच्या विचारांवर चालतं. गोळवलकर यांचे विचार आज ना उद्या संपतील, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार कधी संपणार नाहीत’, असं यावेळी नवाब मलिक म्हणाले.

‘आरएसएसनं ५० वर्ष तिरंगा फडकावला नाही’

- Advertisement -

दरम्यान, यावेळी आरएसएसवर देखील नवाब मलिक यांनी निशाणा साधला. ‘अमित शहा यांनी २२ सप्टेंबरला मुंबईत कलम ३७० आणि जम्मू-काश्मीरमधील सरकार यांच्याविरोधात वक्तव्य केली. मग मेहबुबा मुफ्तींसोबत त्यांनी कोणत्या देशातलं सरकार चालवलं होतं?’ असा सवाल मलिक यांनी केला. तसेच, ‘आत्ता ते काश्मीरच्या झेंड्याबद्दल बोलत आहेत. पण मग १९९७पर्यंत संघाने राष्ट्रीय ध्वज का फडकावला नाही? १९९७मध्ये स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतर आम्ही शाखेत झेंडा फडकवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली, तेव्हा कुठे संघाच्या शाखांमध्ये तिरंगा फडकू लागला’, असंही मलिक म्हणाले.

‘अदानी-अंबानींसाठी ३७०विरुद्ध प्रचार’

बहुसंख्य काश्मिरींना भारतात यायचं आहे. पण भाजप मात्र कलम ३७० पुढे करून देशभर प्रचार करत आहे. पण सोनमर्ग, गुलमर्ग या भागांमध्ये अदानी-अंबानी यांना जमिनी घेता याव्यात, म्हणूनच तसा प्रचार सुरू आहे, असं नवाब मलिक म्हणाले. नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्याला परवानगी का देण्यात आली नाही? याचीही माहिती लोकांना दिली पाहिजे. शिमलामध्ये लागू असलेलं कलम ३७१ कधी हटवणार? उत्तराखंडमध्ये बाहेरच्या व्यक्तीला जमीन कधी घेता येणार? नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्याला परवानगी का दिली? याचीही उत्तरं सरकारला द्यावी लागतील’, असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -