सनातनचा संकटनिवारण यज्ञ; कुठल्या संकटाची त्यांना लागली चाहूल?

Mumbai
छायाचित्र प्रतीकात्मक

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीवर येणाऱ्या संकटांच्या निवारणार्थ नुकताच गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात यज्ञयाग करण्यात आला. २३ जून रोजी करण्यात आलेल्या या बगलामुखी यागात संकट निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली, तसेच बगलामुखी ब्रम्हास्त्र मंत्र म्हणून आहुति देण्यात आली. याशिवाय बगलामुखी देवीच्या मूळ स्थानी म्हणजेच हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील मंदिरातही यज्ञयाग करण्यात आल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या दैनिक सनातन प्रभातमध्ये म्हटले आहे.

दाभोळकर खटल्यात सनातनचे नाव का?

मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर नेमके कोणते संकट येणार आहे? याचा उल्लेख मात्र या वृत्तात करण्यात आलेला नाही. आज याच दैनिकाने दाभोळकर हत्याकांडातील संशयित ॲड. संजीव पुनाळेकरांसंदर्भात दुसरे वृत्त प्रकाशित केले असून सीबीआयकडून या खटल्यावर ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणे कामकाज केले जाते की काय असा प्रश्न या वृत्तात विचारला आहे. पुनाळेकर यांचे वकील ॲड. इचलकरंजीकर यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. हा खटला केवळ संजीव पुनाळेकर यांच्याबद्दल असताना वारंवार विशिष्ट व्यक्ती हे सनातचे आहेत असा उ्ल्लेख केला जात आहे. तसेच या खटल्यात सनातनचे नाव आणणे चुकीचे आहे असेही पुनाळेकरांचे वकील इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.

सनातनने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा स्क्रिन शॉट

हत्येची कबुली आणि पुनाळेकरचे सहभाग

दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणातील मोठा खुलासा समोर आला असून याप्रकरणी कळसकर आणि अंदुरेने झाडल्या गोळ्याची कबुली दिली आहे. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे. मागच्यावर्षी जून महिन्यात ‘मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता’, अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली आहे. सीबीआयने २५ मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली होती. सीबीआयने अटक केलेल्या पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर येत्या ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here