घरमुंबईमुंबईत २६ ठिकाणी असणार महिला कर्मचारी संचालित 'सखी मतदान केंद्र'

मुंबईत २६ ठिकाणी असणार महिला कर्मचारी संचालित ‘सखी मतदान केंद्र’

Subscribe

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये मतदानाच्या दिवशी केवळ महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित होणार आहेत.

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमाची अधिकाधिक परिपूर्ण अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु आहे. याच अंमलबजावणीचा भाग म्हणून लिंगभेद निर्मूलन जाणीवजागृतीसह महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये मतदानाच्या दिवशी केवळ महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित होणारे प्रत्येकी एक मतदान केंद्र प्रतिकात्मक स्वरुपात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धी माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाचा उपक्रम 

वरीलनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण २६ केंद्रे उभारण्यात येणार असून यांना ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. या मतदान केंद्राचे मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक आदी सर्व कर्मचारी महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांना ‘सॅनटरी पॅड’चे पाकीट देण्यात येणार आहे. तसेच रांगोळी, पोस्टर्स इत्यादींनी सजविण्यात येणाऱ्या सखी मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या सर्व मतदारांना थंड पेयाचा आस्वाद घेण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

२६ मतदान केंद्रांवर १३० महिला कर्मचारी

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या सोमवारी म्हणजेच २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्यातील २६ विधानसभा मतदार संघांच्या कार्यक्षेत्रात एकूण ७ हजार ४७२ मतदान केंद्र असणार आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्थापन आणि नियोजनासाठी ५ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तर यापैकी सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या २६ मतदान केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या पाचही कर्मचारी महिलाच असणार आहेत. यानुसार या २६ मतदान केंद्रांवर १३० महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -