वसईत डेंग्यूने दोघांचा मृत्यू

आतापर्यंत सात जणांना मृत्यू, शहरात डेंग्यूचे 104 संशयित रुग्ण

aedes_aegypti_doggett
डेंग्यू

वसई विरार परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून दोन दिवसांपूर्वी शहरातील दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात डेंग्यूमुळे सात बळी पडले आहे. तर सध्या शहरात डेंग्यूचे 104 संशयित रुग्ण असल्याची महापालिकेकडे नोंद आहे.

वालीव येथे राहणार्‍या शाहीदा सलामात शेख (22) या तरुणीला डेंग्यूची लागण झाली होती. तिच्यावर जोगेश्वरी येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. त्याचदिवशी वालीव परिसरातच राहणार्‍या मोहम्मद नफीज अन्सारी (46) यांचाही डेंग्यूने मृत्यू झाला. डेंग्यूची लागण झालेल्या अन्सारी यांच्यावर खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

याआधी बोळींजच्या प्रमिला नाईक, वंदना पाटील, नालासोपारा पूर्वेकडील आकाश विश्वकर्मा, सोपारा गावातील अठरा वर्षीय शबनम मोल्लीन यांच्यासह नालासोपारा पूर्वेकडील एक जणांचा मिळून आतापर्यंत सात जणांचे जीव गेले आहेत. सध्या शहरातील 104 डेेंग्यूचे संशयित रुग्ण विविध हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असल्याची अधिकृत माहिती महापालिकेच्या दप्तरी आहे. पण, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रुग्ण खाजगी उपचार घेत आहेत.