अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत असताना आता भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘आत्महत्या झाली त्या दिवशी सुशांत सिंह राजपूत दुबईच्या एका ड्रग डिलरला भेटला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमध्ये दुबईच्या ड्रग डिलरचं कनेक्शन आहे’, असं सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांचं म्हणणं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी त्यासंदर्भात एक ट्वीट करून सवाल उपस्थित केला आहे. शिवाय, सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput Suicide) प्रकरणाची तुलना त्यांनी सुनंदा पुष्कर आणि श्रीदेवी यांच्या प्रकरणांशी देखील केली आहे. त्यामुळे आता सुशांतच्या प्रकरणाला या दाव्यातून एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले सुब्रह्मण्यम स्वामी?
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये संबंधित ड्रग डिलरचं नाव देखील देण्यात आलं आहे. ‘सुनंदा पुष्कर प्रकरणामध्ये AIIMS च्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात काय सापडलं होतं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. पण अभिनेत्री श्रीदेवी किंवा सुशांतसिंहच्या प्रकरणात असं काहीही घडलेलं नाही. सुशांतच्या प्रकरणामध्ये दुबई कनेक्शन आहे. दुबईचा ड्रग डिलर (Drug Dealer) आयश खान आत्महत्येच्या दिवशी सुशांतला का भेटला होता?’ असा सवाल सुब्रह्मण्यम स्वामींनी उपस्थित केला आहे.
Like in Sunanda Pushkar case the real give away was what was found in her stomach during post mortem by AIIMS doctors. This was not done for Sridevi or Sushant. In Sushant case a Dubai compliant drug dealer Ayash Khan had met Sushant on the day of Sushant’s murder. Why?
— Subramanian Swamy (@Swamy39) August 24, 2020
काही दिवसांपूर्वी देखील सुब्रह्मण्यम स्वामींनी सुशांत सिंह राजपूतची हत्या पूर्ण नियोजन करून करण्यात आल्याचा दावा केला होता. दुबईत सुशांत पैशांच्या व्यवहारामध्ये अडकला होता असं देखील ते म्हणाले होते. आता त्यांनी थेट त्या ड्रग डिलरचं नावच जाहीर केलं आहे. CBI ने सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यापासून अनेक नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या सीबीआय सुशांतच्या घरी जाऊन तपास करत असून त्यातून काही धागेदोरे मिळतात का? याचा प्रयत्न करत आहे.