घरताज्या घडामोडीहायकोर्टाचे राऊत यांना खडे बोल

हायकोर्टाचे राऊत यांना खडे बोल

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही तोशेरे

अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भाग्यवंत लाटे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खडे बोल सुनावले. या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलेल्या या दोघांनी आपले उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यावेळी हायकोर्टाने ‘इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता,’ असे सुनावले. या प्रकरणी आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या बंगल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी आपल्याला नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी कंगनाने हायकोर्टात केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असे सांगत तिने राऊतांना या प्रकरणात ओढले. तसेच, तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून कोर्टाने स्पष्टीकरण मागवले आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना नंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली. मात्र, बंगला अंशतः तोडलेल्या अवस्थेत असल्याने आणि पावसाळा सुरू असल्याने सुनावणी अधिक लांबवू शकत नाही, असे बजावत हायकोर्टाने उद्या याचिकादारांच्या वकिलांना युक्तिवाद सुरू करण्यास परवानगी दिली.

प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणार्‍या लाटे यांच्या वकिलांना मात्र कोर्टाने फटकारले. ‘इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता,’ असे कोर्टाने सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -