घरताज्या घडामोडीAryan khan drugs case- दहा वर्षांपूर्वीही शाहरुखला नडले होते वानखेडे

Aryan khan drugs case- दहा वर्षांपूर्वीही शाहरुखला नडले होते वानखेडे

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी गेले २५ दिवस तुरुंगात असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामिन मंजूर केला. तर आर्यनला तुरुंगात टाकणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मात्र चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. पण शाहरुख आणि वानखेडे यांच्यात झालेला हा पहीलाच सामना नसून दहा वर्षांपूर्वीही वानखेडे शाहरुखला असेच नडले होते आणि त्याच्याकडून दीड लाखाचा दंड वसूल केला होता.

नेमके काय आहे प्रकरण ?
जुलै २०११ मध्ये शाहरुख खान कुटुंबीयांसह सुट्ट्या घालवण्यासाठी लंडनला गेला होता. सुट्ट्या संपल्यानंतर तो मुंबईत परतला . त्यावेळी समीर वानखेडे एयरपोर्ट कस्टम डिपार्टमेंटच्या सर्विस डिपार्टमेंटचे प्रमुख होते. शाहरुख स्वत:सोबत २० बॅग्ज घेऊन आला होता. यामुळे वानखेडे आणि त्यांच्या टीमने शाहरुखची बराच वेळ चौकशी केली. त्यानंतर एक्स्ट्रा लगेज आणल्यामुळे त्याच्याकडून दीड लाखाचा दंड वसूल केला होता. त्यानंतर थेट दहा वर्षांनंतर आर्यनच्या निमित्ताने समीर वानखेडे आणि शाहरुख खान पुन्हा एकदा समोरा समोर आले आहेत.

- Advertisement -

समीर वानखेडे २००८ बॅचचे IRS अधिकारी आहेत. NCB मध्ये येण्याआधी वानखेडे एअरपोर्ट कस्टम डिपार्टमेंट, सर्विस टॅक्स डिपार्टमेंटचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांनी रणबीर कपूर, अनुराग कश्यप यांच्यासारख्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजविरोधात कारवाई केल्या आहेत. त्यावेळीही ते आजच्याप्रमाणे चर्चेत आले होते.

२ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया नावाच्या क्रूझवर रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने धाड घातली. यावेळी त्यात आर्यन खान, अरबाज खान, मुनमुन धामेचा यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर १३ जणांना एनसीबीने अटक केली होती. ड्र्ग्ज खरेदी करणे आणि विकणे असे आरोप आर्यनसह इतर दोघांवर करण्यात आले होते. तेव्हापासून हे तिघे तुरुंगात होते. आज मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना जामिन मंजूर केला आहे. तर दुसरीकडे याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सतत वानखेडेंवर नवीन आरोप करत आहेत. याचदरम्यान, पंच आणि बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे, किरण गोसावी आणि शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात २५ कोटींची डील झाल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यामागे आता एनसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -