घरताज्या घडामोडीफडणवीसांनी छळल्यानेच राष्ट्रवादीत

फडणवीसांनी छळल्यानेच राष्ट्रवादीत

Subscribe

भाजपवर माझा रोष नाही, एकनाथ खडसे यांची कबुली, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा ,शुक्रवारी मुलीसह राष्ट्रवादीत प्रवेश

माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि तो फडणवीसांनी करायला लावला. या सर्व मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला. भाजपचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. गेले काही दिवस खडसे भाजप सोडणार अशा चर्चा रंगल्या, अखेर येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर खडसे हे पत्रकारांशी बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, ‘ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते. त्यांच्यासोबत आजतागायत भाजपचे काम केले आणि पक्ष वाढवला. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ते कदापी नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील एकाही नेत्यावर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. खासदार रक्षा खडसे या देखील भाजप सोडणार नाहीत, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत,’ असे सूचक विधान खडसे यांनी केले. राष्ट्रवादीने खडसेंसारखा एक मोठा नेता गळाला लावल्याने येत्या काही दिवसांत फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू होईल आणि ऐन दिवळीअगोदरच फटाके वाजयला सुरूवात होईल.

- Advertisement -

‘त्या कालखंडात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा इतर कोणत्याही पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेण्यात आला. माझी भाजपाविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्वाविषयी किंवा प्रदेश कार्यकारिणीवर मी नाराज नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच मी भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भाजपसाठी उभे आयुष्य घालवले. मात्र, माझ्या चौकशा फडणवीसांनी लावल्या व त्यामुळे प्रचंड बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे देणे नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली. ही एकप्रकारे मंत्र्यावर पाळत होती. पुढे जाऊन त्याची कबुली सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दिली. जे पद मिळवले ते मी स्वतःच्या ताकदीवर मिळवल्याचे त्यांनी सांगितले. आजही मोठे आक्षेप असलेले नेते भाजपत कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

माझ्या मागे भ्रष्टाचारविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते; पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. मी १५ दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र, यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मन:स्ताप भोगावा लागला, असेही खडसे म्हणाले.

जनता हीच माझी ताकद
जनतेची ताकद माझ्यासोबत असल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना आज खूप वाईट वाटत आहे. भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. लोकं शिव्या द्यायचे, दगडधोंडे मारायचे, थुंकायचे तेव्हा आम्ही पक्षासाठी पायपीट केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनगंटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम केले. पण नंतरच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. पक्षाने अनेक मोठी पदे दिली. माझा भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही नव्हता, असेही ते म्हणाले आहेत.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा आनंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी उस्मानाबाद दौर्‍यावर आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही खूप आनंदाची बातमी आहे.खडसेंचे महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चर्चा रंगली होती. परंतु राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. तर खडसेंनी देखील या वृत्ताचे खंडन केले होते.

भाजपला बसणार मोठा फटका

भाजपचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसणार आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते असल्यापासून भारतीय जनता पक्षाचे अत्यंत कणखर आणि प्रभावी नेते म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे रुजली नव्हती तेव्हापासून एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे कार्यकर्ते पक्षाला उभारी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. काँग्रेस पक्षाची राजवट राज्यात असताना त्या राजवटीत समोर एकाकी लढा देणारे म्हणून एकनाथ खडसे यांचा भाजपचे सगळेच नेते आणि कार्यकर्ते आवर्जून उल्लेख करतात. यामुळेच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये चांगली पकड घेता आली.

मात्र, राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळायची वेळ येताच राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी खडसेंना डावलले. सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाकडून विदर्भातील नेते देवेंद्र फडणवीस यांना या पदावर बसवण्यात आले. फडणवीस तसे पक्षात ज्युनियर. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असल्याच्या एकमेव निकषावर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर इतरांना कामाची संधी देण्याचे कर्तव्य फडणवीस विसरले. यातूनच महसूल मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांचा पीए समजल्या जाणार्‍या गजानन पाटील या इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी थेट मंत्रालयाच्या गेटवर ताब्यात घेतले. कुठल्याशा कामासाठी ३० लाख रुपयांची मागणी केली, असा त्यांच्यावर आरोप होता. मात्र तो सिद्ध होऊ शकला नाही. चौकशीमध्ये खडसे यांच्यावरील आरोप हे फेटाळण्यात आले आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये खडसेंना पुन्हा घेतले जाईल, अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. परंतु खडसे यांना तिथेही संधी देण्यात आली नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खडसे यांना जळगावच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता होती. परंतु निवड समितीने खडसे यांना उमेदवारी दिली नाही. खडसे यांच्या बरोबरच स्पर्धेत नावे येणार्‍या विनोद तावडे, गडकरी समर्थक असलेले चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. न मागताही खडसे यांची कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना आणि परळीत पंकजा मुंडे यांना कोणतीही मदत न करता उलट विरोधकांना फूस देण्यात आली. यामुळे मुक्ताईत रोहिणी आणि परळीत पंकजा यांचा दारूण पराभव झाला.

पुढे खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जात असताना खडसे यांना दिल्लीत पाचारण होण्यास सांगण्यात आले. तेव्हाही प्रदेशमधून विरोधी सूर आळवण्यात आला. यानंतर असलेल्या विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही तसा शब्द खडसेंना दिला होता. मात्र, अखेरपर्यंत त्यांना ताकास तूर लागू दिला नाही. शेवटी त्यांना इथेही तिकीट कापण्यात आले. शेवटी त्यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीची वाट धरली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -