घरताज्या घडामोडीभाजपचे १२ आमदार राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक

भाजपचे १२ आमदार राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी अधिकृत याबाबत घोषणा केली. यावेळी जयंत पाटलांनी विविध भागातील दहा ते बारा भाजप नेत्यांशी चर्चा झाली असून त्यांची देखील पक्षात येण्याची इच्छा असल्याचे म्हणत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.तसेच एकनाथ खडसे यांच्यासह आणखी कोणकोण येणार याचा उलगडा हळूहळू होईल,असे सूचक विधान जयंत पाटलांनी केले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसल्याचे मानले जात असतानाच भाजपला आणखी धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.खडसेंच्या बरोबर भाजपाचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.खासगीत बर्‍याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे.जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे अनेक नेते राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत.

- Advertisement -

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असल्याने विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागेल. मात्र, सध्याच्या काळात विधानसभेची पोटनिवडणूक घेणे परवडणार नाही. त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार पुढील काळात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

भाजपकडून हिरमोड झालेले आणि विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील. खडसेंसह कोणकोण येणार याचा उलगडा हळूहळू होईल,आम्ही घाई करत नाही. यासह विविध भागातील अनेक भाजप नेत्यांशी चर्चा झाली. त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. याबाबत लवकरच समजेल असे सांगत, एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही तर दिवसाढवळ्या होईल, असा चिमटाही जयंत पाटलांनी भाजपला काढला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न कुठेतरी तोकडे पडले असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

’नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे आणि यापुढेही भाजपतच काम करत राहणार आहे.
-रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजप खासदार

पक्ष सोडताना कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन. कुणाच्या जाण्याचे पक्ष थांबत नसतो. माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या.
-देवेंद्र फडणवीस, विरोध पक्षनेते, विधानसभा.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ही खूप आनंदाची बातमी आहे.खडसेंचे महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -