घरताज्या घडामोडीतीन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकर्‍यांची मागणी

तीन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकर्‍यांची मागणी

Subscribe

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता इतर राज्यांकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे.

अशा परिस्थितीत केंद्र सरकार आता शेतकरी संघटनांशी बोलून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारसोबत होणार्‍या चर्चेच्या दुसर्‍या फेरीपूर्वी शेतकर्‍यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर लेखी स्वरूपात ठेवल्या आहेत, त्यावरून त्यांना कोणत्याही प्रकारे लेखी हमी हवी आहे.

- Advertisement -

गेल्या एक आठवड्यापासून दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकरी आंदोलन तीव्र होत आहे. दिल्लीमध्ये जाण्यासाठी हरयाणा आणि पंजाबमधील शेतकर्‍यांसोबत अनेक संघटना सुद्धा सामील झाल्या आहेत. जर सरकारने दोन दिवसांत शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीतील सर्व ट्रक व टॅक्सी थांबवल्या जातील, असा इशारा आंदोलक शेतकर्‍यांनी दिला आहे.

शेतकरी संघटनांच्या मागण्या
>> तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत.
>> वायू प्रदूषण कायद्यात पुन्हा बदल व्हावा.
>> वीजबिलाच्या कायद्यात बदल आहे, तो चुकीचा आहे.
>> किमान आधारभूत किमतीबाबत लेखी हमी द्या.
>> शेती करारावर (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) शेतकर्‍यांचा आक्षेप.
>> शेतकर्‍यांनी अशा विधेयकाची मागणी केली नाही, तर ते का आणले?
>> डिझेलची किंमत निम्मी करा.

- Advertisement -

दरम्यान, एकीकडे दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा झाली. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकरी प्रश्नांवर चर्चा केली.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकर्‍यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अकोला, नाशिक, शेगाव, नागपूर, नगर, इचलकरंजी, उस्मानाबाद, शहापूर, पालघर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकर्‍यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात गुरुवारी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतकर्‍यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले होते.

गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. राज्यातील शेतकर्‍यांनी आज रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केलं. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी शेतकर्‍यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केले. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. त्यामुळे या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -