घरदेश-विदेशब्रिटनचे पंतप्रधान कृषी सुनक यांच्या नव्या मंत्रिमंडळात फेरबदल, अर्थमंत्री कायम

ब्रिटनचे पंतप्रधान कृषी सुनक यांच्या नव्या मंत्रिमंडळात फेरबदल, अर्थमंत्री कायम

Subscribe

लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी मंगळवारी प्रिन्स चार्ल्स यांची भेटे घेतल्यावर “काम ताबडतोब सुरू करेन” असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी तासाभरातच केली आहे. त्यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करताना माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पद सोडण्यास सांगितले आहे.

जुलै महिन्यात ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यासह 40 जणांनी राजीनामे दिल्याने ते सरकार कोसळले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. पण अवघ्या 45 दिवसांतच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी हुजूर पक्षाने सोमवारी 42 वर्षीय ऋषी सुनक यांची नेता म्हणून निवड केली होती. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यांच्यासमोर पेनी मॉर्डंट यांचे आव्हान होते. पण पेनी मॉर्डंट यांनीही माघार घेतल्याने ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत.

- Advertisement -

ऋषी सुनक यांनी आज, मंगळवारी बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली. प्रिन्स चार्ल्स यांनी यावेळी सुनक यांना नियुक्तीपत्र देऊन नवे सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार त्यांनी सूत्रे हाती घेतल्यावर लिझ ट्रस मंत्रिंडळातील काही मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले. न्यायमंत्री ब्रँडन लुईस, कार्य आणि निवृत्तीवेतनमंत्री क्लो स्मिथ, विकासमंत्री विकी फोर्ड आणि व्यापार सचिव जेकब रीस मॉग यांना पद सोडण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय कॅबिनेट ऑफिस मिनिस्टरपदी असलेल्या भारतीय वंशाच्या आलोक शर्मा यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तर, उपपंतप्रधान म्हणून डॉमिनिक राब आणि अर्थमंत्री म्हणून जेरेमी हंट अशा दोन महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेरेमी हंट हे लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीच होते. त्यांना या पदावर कायम ठेवले आहे.

जेम्स क्लेव्हरली यांची पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल आणि विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेन वॉलेस यांची संरक्षण राज्यमंत्री म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नादिम जहवी यांची बिनखात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रत्येक दिवस आशावादी
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनवासीयांना संबोधित केले. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना देशाचा विकास करायचा होता, त्यामुळे त्यांची धोरणे चुकीची नव्हती. मी बदल घडवणाऱ्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण यामध्ये काही चुका झाल्या. परंतु आता माझं सरकार अशी अर्थव्यवस्था तयार करेल जे ब्रेग्झिटच्या संधी निर्माण करेल. आम्ही ब्रिटनसाठी योग्य भविष्य घडवू आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस आशावादी बनवू, असे ऋषी सुनक म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -