घरदेश-विदेशमोदी सरकारविरोधात २६ मे रोजी काँग्रेसचा 'विश्वासघात दिवस'

मोदी सरकारविरोधात २६ मे रोजी काँग्रेसचा ‘विश्वासघात दिवस’

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारची चार वर्ष जनतेसाठी विश्वासघातासारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारला २६ मे रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस काँग्रेस विश्वासघात दिवस म्हणून पाळणार आहे. यावेळी देशभरात काँग्रेस आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.

‘मोदींनी सर्वांचा विश्वासघात केला’
या वेळी गेहलोत यांनी असं सांगितलं की, “काँग्रेसने कधीही वर्धापन दिवस साजरा केला नाही. केंद्र सरकार लोकांना फक्त आश्वासन देत आहे. लोकांमध्ये भिती, अविश्वास आणि हिंसात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम मोदी सरकारकडून सुरु आहे. एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अहिंसा आणि प्रेमाच्या राजकारणासंदर्भात बोलतात. तर दुसरीकडे आरएसएसची विचारधारा याच्या अगदी उलट आहे. मोदी सरकारवर कोणताच वर्ग खूश नाहीये. शेतकरी, युवा आणि व्यापारी या सर्वांसोबत मोदी सरकारने विश्वासघात केला आहे.

- Advertisement -

‘जनतेच्या खिशाला कात्री’
“महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होत चालली आहे. तरी सरकार यावर कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही”, असा आरोप गेहलोत यांनी केला. देशातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला सरकार कात्री लावत आहे. “यांच्या बोलण्या आणि करण्यामध्ये खूप फरक आहे. देशातील दलित वर्ग सुरक्षित नाही, अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत आहेत. लव जिहाद, घर वापसी या सारख्या घटना घडत असताना देखील सराकर शांत का?” असा सवालही गेहलोत यांनी केलाय.

‘काँग्रेसच्याच आमदारांना केलं जातंय टार्गेट’
दरम्यान, गेहलोत यांनी अमित शहा यांच्यावर देखील टीका केलीय. काँग्रेसचे आमदार हॉटेलमध्ये नसते, तर आम्ही सरकार बनवले असते, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. या सरकारने आतापर्यंत फक्त काँग्रेसच्या लोकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. इनकम टॅक्स, सीबीआय, ईडी यांचा दुरुपयोग केला जात आहे. मोदी सरकार आपल्या पक्षातीलच लोकांची चौकशी का नाही करत? असा सवाल त्यांनी केलाय.

- Advertisement -

‘केंद्र सरकारच पर्दाफाश करू’
२६ मे रोजी मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होणार आहेत. हा दिवस काँग्रेस ‘विश्वासघात दिवस’ म्हणून पाळणार असून संपूर्ण देशभरात आंदोलन करणार आहे. या आंदोलनादरम्यान काँग्रेस जनतेच्या समस्येचे मुद्दे उचलून धरणार आहे. केंद्र सरकारचा पर्दाफाश करुन काँग्रेस जनतेसोबत असल्याचा विश्वास यावेळी ते जनतेला करुन देणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारपासून सुटका करायची असेल, तर एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे, असंही गेहलोत यांनी सांगितलं. दरम्यान, या पत्रकार परिषदेत काँग्रेसने विश्वासघाताचे पोस्टर देखील प्रसिद्ध केले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -