दिल्ली विधानसभा निवडणूक- पराभव जिव्हारी लागल्याने मनोज तिवारी राजीनाम्याच्या तयारीत

delhi bjp chief manoj tiwari
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. याचपार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला असून पदावर कायम राहण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत भाजपला ४८ जागा मिळतील असा दावा मनोज तिवारी यांनी केला होता. पण आपने दमदार कामगिरी करत भाजपचा पार धुव्वा उडवला. यामुळे भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले.

तिवारी यांनी दिल्लीत भाजप बहुमताने जिंकणार असा दावा केला होता. मंगळवारी दुपारपर्यंत तिवारी आपल्या या दाव्यावर ठाम होते. त्यांनी तसे वृत्तवाहिनींबरोबर बोलतानाही सांगितले होते. पण जसे जसे आपचे पारडे जड होऊ लागले तसा तिवारी यांचा बहुमताचा सूरही नरम पडला. ट्रोलर्सनी तिवारी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिवारी यांच्या रिंकीया के पापा गाण्यावर तर आपच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. त्यानंतर मात्र तिवारी यांनी भाजप पराभूत झाल्याचे स्विकारत केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या.

८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या आकडेवारीनुसार आपच विजयी होणार असे भाकीत अनेकांनी व्यक्त केले होते. पण मनोज तिवारी मात्र भाजपला ४८ जागा मिळतील असे छातीठोकपणे सांगत होते. त्यांनी तसे टि्वटही केले होते. एक्झिट पोलने व्यक्त केलेले दावे फोल ठरणार आहेत. माझे हे टि्वट सांभाळून ठेवा. दिल्लीत ४८ जागांवर विजय मिळवत भाजपची सरकार येणार. कृपया ईव्हिएमवर याचे खापर फोडण्यासाठी बहाणे शोधू नका. असा खोचक सल्लाही तिवारी यांनी टि्वटरवर दिला होता. यामुळे आपचा विजय निश्चित होताच नेटकऱ्यांनी तिवारी यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

त्यावर व्य़थित झालेल्या तिवारी यांनी मी प्रदेश अध्यक्ष आहे. आम्ही एक अंतर्गत सर्वे केला होता. पण तो चुकीचा ठरला. पण तरीही कोणताही प्रदेश अध्यक्ष अंतिम मतमोजणीचा आकडा समोर येत नाही त्याआधीच पराजय झाल्याचे बोलू शकत नाही. ज्यांना फक्त ४ टक्के मत मिळाली आहेत त्यांनीही पराभवाची भाषा करू नये. शेवटपर्यंत लढायला हवे. असेही तिवारी त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. तसेच मला वाटले होते कि ज्या ४८ विधानसभा क्षेत्रांमध्ये रस्ते, पाणी, वीज यांची वाईट अवस्था आहे. त्या मतदारसंघातील नागरिक नवीन उमेदवाराला नक्कीच संधी देतील अशा आम्हांला विश्वास होता. पण तसे झाले नाही. याबद्दल मी जे टि्वट केले होते ते तुम्ही सांभाळून ठेवा असेही तिवारी यांनी ट्रोलर्सला म्हटले आहे.