घरदेश-विदेशIndia Vs US : मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा अहवाल भारताने फेटाळला, रिपोर्ट पक्षपाती असल्याचा...

India Vs US : मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा अहवाल भारताने फेटाळला, रिपोर्ट पक्षपाती असल्याचा दावा

Subscribe

अमेरिकेसोबतच्या होणाऱ्या चर्चेत, आम्ही वारंवार वंशभेदावरून होत असलेले हल्ले, द्वेषपूर्ण गुन्हे आणि बंदुकीच्या हिंसाचाराशी संबंधित समस्यांवर सातत्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेला मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतचा अहवाल भारताने पूर्णपणे फेटाळला आहे. मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे अमेरिकेने या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल भेदभावपूर्ण आणि पक्षपाती असून भारताबद्दलची समज कमी असल्याचे यातून दिसते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (India vs US: External Affairs Ministry rejects allegations of human rights violations)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये, आपली बाजू ठामपणे मांडताना भारताने अमेरिकेतील वांशिक हिंसाचार आणि गोळीबाराच्या प्रकरणांचा उल्लेख केला. वैविध्यपूर्ण समाजरचना असलेला भारत धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचा आदर करतो. अमेरिकेशी झालेल्या चर्चेत आम्ही तिथल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. यात वंश आणि मूळ नागरिकत्व यावरून होणारे प्राणघातक हल्ले, द्वेषपूर्ण गुन्हे आणि गोळीबार मुद्द्यांचा समावेश होता, असे ते म्हणाले.

- Advertisement -

अमेरिकेसोबतच्या होणाऱ्या चर्चेत, आम्ही वारंवार वंशभेदावरून होत असलेले हल्ले, द्वेषपूर्ण गुन्हे आणि बंदुकीच्या हिंसाचाराशी संबंधित समस्यांवर सातत्याने आमची चिंता व्यक्त केली आहे. व्होट बँकेच्या राजकारणाने प्रेरित विचार आणि मतांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत. राजकीयदृष्ट्या प्रेरित माहितीच्या आधारित मूल्यांकन टाळावे, असा आमचा आग्रह आहे, असे सांगत, आम्ही हा अहवाल पूर्णपणे फेटाळत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कोलंबिया विद्यापीठ आणि अमेरिकेतील इतर विद्यापीठांमध्ये होत असलेल्या आंदोलनाबाबत रणधीर जयस्वाल म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा अहवाल पाहिला आहे. आम्ही संबंधित घटनांवर लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक प्रकारच्या लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच समजूतदारपणा यांच्यात योग्य संतुलन असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

चीन आणि बांगलादेशच्या संयुक्त सरावावर नजर

चिनी सैन्याने बांगलादेशात जाऊन तेथील सैन्याबरोबर संयुक्त सराव केला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे बांगलादेशकडे जाणे ही चिंतेची बाब आहे. आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर बारीक नजर ठेवून आहोत, असे रणधीर जयस्वाल म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अमेठीत आधी बसलाय दिग्गजांना धक्का, मग आताच चर्चा का?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -