घरदेश-विदेशसरकारने रचला नवभारताचा पाया -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सरकारने रचला नवभारताचा पाया -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी हे दशक भारतासाठी फार महत्वाचे असून नव्या भारताच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून पाया रचण्यात आला आहे, असे सांगितले. रामनाथ कोविंद यांनी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. सोबतच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्णयानंतर देशवासियांना शांतता राखल्याबद्दल प्रशंसा केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात तिहेरी तलाक, सुधारित नागरिकत्व कायदा, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, पायाभूत सुविधांतील कामे, उद्योगक्षेत्राला पाठबळ, कोरोनाविरोधातील लढा या सर्व आघाड्यांवर केंद्र सरकारने केलेल्या कामांचे आणि घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचे कौतुक केले.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेपैकी एक झाला आहे. देशातील स्टार्ट-अप ईको-सिस्टम आपल्या युवा नेतृत्वामध्ये वेगाने आकार घेत आहे. डिजिटल इंडिया आणि डिजिटल इकॉनॉमीच्या वाढत्या प्रसाराच्या संदर्भात यूपीआय प्लॅटफॉर्मच्या सफलतेसाठी केंद्र सरकारचे कौतुक आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. देशात इंटरनेटचा दर सर्वात कमी आहे. स्मार्ट फोनच्या किमतीसुद्धा कमी असल्यामुळे याचा युवकांना चांगला फायदा होत आहे. सध्याच्या घडीला भारत जगात मोबाईलची सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे.

कोरोना लसीकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, कोरोना लसीकरण मोहिमेत भारताचे सामर्थ्य दिसून आले आहे. देशात एका वर्षपेक्षा कमी वेळात १५० कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करत नवा इतिहास रचला आहे. भारतात निर्माण करण्यात आलेली लस जगात कोरोना विरोधात कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे.

- Advertisement -

देशात तिहेरी तलाक कायद्याने गुन्हा घोषित करण्यात आले असून समाजाला या प्रथेपासून मुक्त केले आहे. महिला सशक्तिकरण हे केंद्र सरकारच्या प्राथमिकतेमधील एक धोरण आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सुधारित नागरिकत्व कायदा तयार करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण केली आहे. ३७० कलम आणि ३५ हटवले जाणे फक्त ऐतिहासिक नाही, तर यामुळे त्यांच्या विकासाची दारे खुली झाली आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकास, तेथील संस्कृती आणि परंपरेचे रक्षण, पारदर्शी कारभार करणे माझ्या सरकारची प्राथमिकता आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

राष्ट्रीय महामार्गांची लांबी एक लाख ४० हजार
पायाभूत सुविधांच्या कामाला गती देण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रालयांची कामे पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान एकत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रस्त्यांवर, पायाभूत सुविधा आणि संसाधने निर्माण करण्यास गती मिळत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील यश अभिमानास्पद आहे. आपल्या देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी ९० हजार किलोमीटर होती ती आज एक लाख चाळीस हजार किलोमीटरहून अधिक करण्यात आली आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता
केंद्र सरकारचे देशाच्या सुरक्षेसाठी दृढनिश्चयाने काम सुरू आहे. सरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात विशेषत: संरक्षण उत्पादनामध्ये देश आत्मनिर्भरता वाढत आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडसोबत 83 एलसीए तेजस फायटर एअरक्राफ्टची निर्मिती करण्यात येत आहे. ऑर्डनन्स फॅक्ट्रीजचे 7 संरक्षण PSU मध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. आपल्या सैन्याला लागणारा माल भारतातच विकसित व्हावा आणि भारतातच तयार व्हावा हे केंद्राचे ध्येय असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

भारतातील वारसा पुन्हा आणला
भारताच्या प्राचीन वारशाचे जतन, समृद्ध आणि सक्षमीकरण करण्याचे केंद्र सरकार आपली जबाबदारी मानते. भारताचा अनमोल वारसा देशात परत यावा, यालाही सरकारचे प्राधान्य राहिले आहे. भारतातून शंभर वर्षांपूर्वी चोरीला गेलेली आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती परत आणून काशी विश्वनाथ मंदिरात स्थापित करण्यात आली असल्याचे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -