घरदेश-विदेशLok Sabha 2024 : राहुल गांधींच्या वक्तव्याने वादंग, 181 संतप्त कुलगुरूंनी लिहिले...

Lok Sabha 2024 : राहुल गांधींच्या वक्तव्याने वादंग, 181 संतप्त कुलगुरूंनी लिहिले खुले पत्र

Subscribe

कुलगुरूंची नियुक्ती अत्यंत कठोर, पारदर्शक प्रक्रियेअंतर्गत केली जाते. त्यासाठी संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, हे पाहिले जाते.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले असून आता पाच टप्पे उरले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा वाढत चालला आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. यावर देशातील 181 संतप्त शिक्षणतज्ज्ञ आणि कुलगुरूंनी राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले आहे. (Lok Sabha Election 2024: Vice-Chancellor objects to Rahul Gandhi’s allegation)

देशातील विद्यापीठांमध्ये केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचीच भरती केली जात आहे. विशेषत:, कुलगुरूंची नियुक्ती करताना गुणवत्ता नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याच्या निकषावर निर्णय घेतला जात आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांनी राहुल गांधी यांच्या या दाव्याला आक्षेप घेतला आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी कुलगुरूंनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील विद्यापीठांमध्ये भरती गुणवत्तेच्या आधारावर होत नसून संबंधित व्यक्ती रा. स्व. संघाशी संबंधित असल्याच्या आधारे होत असल्याच्या अफवा राहुल गांधी पसरवत असल्याचे आम्हाला त्यांच्या ट्वीट आणि वक्तव्यावरून समजले आहे.

- Advertisement -

कुलगुरूंची नियुक्ती अत्यंत कठोर, पारदर्शक प्रक्रियेअंतर्गत केली जाते. त्यासाठी संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, हे पाहिले जाते. विद्यापीठाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे काय व्हिजन आहे आणि त्याची प्रशासकीय कार्यकुशलता किती आहे? हे पाहिले जाते. आमच्याकडे प्रोफेशनल अनुभव असतो आणि शैक्षणिक पात्रता देखील महत्त्वाची आहे. निवड प्रक्रियेत हे लक्षात घेतले जाते, याकडे शिक्षणतज्ज्ञ आणि कुलगुरूंनी या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

अशा काल्पनिक गोष्टी करू नका. कोणतेही तथ्य नसताना संभ्रम पसरवू नका, असे आम्हाला अशा सर्व लोकांना सांगायचे आहे. अशा अफवा पसरवल्याने शैक्षणिक वातावरण बिघडते. आमचा गुणवत्तेवर विश्वास आहे. उच्च शिक्षणासाठी हेच आवश्यक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये झालेल्या सुधारणांचा दाखला देत कुलगुरूंनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत आश्चर्यकारक बदल झाले आहेत. आता आमच्या विद्यापीठांच्या जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तथापि, अशी विधाने करून राहुल गांधी यांनी उच्च शिक्षण संस्थांची बदनामी केली आहे. राजकीय लाभ उठविण्यासाठी असे केले जात असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -