घरदेश-विदेशनवे सरन्यायाधीशच करणार सत्तासंघर्षावर सुनावणी

नवे सरन्यायाधीशच करणार सत्तासंघर्षावर सुनावणी

Subscribe

२९ ऑगस्टच्या सुनावणीवरही प्रश्नचिन्ह कायम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी अपेक्षित असलेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झालीच नाही. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आज शुक्रवार २६ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता ही सुनावणी थेट नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासमोरच होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एखाद्या प्रकरणावरील सुनावणीसाठी तारीख मिळूनही त्यावर सातत्याने सुनावणी न होणे हे सर्वोच्च न्यायालयातील दुर्मीळ उदाहरण म्हणावे लागेल. या वादावरील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट वादावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. वारंवार तारीख पुढे जात असल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. तेव्हा कुठे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती कृष्णमुरारी यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली होती. यावेळी हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच या प्रकरणावरील पुढील सुनावणी २५ ऑगस्टला लिस्ट करावी, असे स्वत: सरन्यायाधीशांनी सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी सुनावणी होणे अपेक्षित असताना सुनावणी झालीच नाही.

- Advertisement -

घटनापीठ तरी वेगाने सुनावणी घेणार का?
हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. नव्या घटनापीठाचे कामकाज कधी सुरू होणार याबद्दल सध्यातरी अनिश्चितताच आहे. शिवाय घटनापीठ किती वेगाने याप्रकरणी सुनावणी घेणार यावरही प्रश्नचिन्ह आहेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -